‘पंतप्रधान किसान योजने’च्या प्रभावी कार्यवाहीसाठी महसूल आणि कृषी विभागांद्वारे येत्या २५ मार्चपासून ५ दिवस राज्यभर विशेष मोहीम !

विधानसभा लक्षवेधी…

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – राज्यातील पंतप्रधान किसान योजनेमध्ये महसूल आणि कृषी विभागांच्या वतीने येत्या २५ मार्चपासून ५ दिवस राज्यभर ‘विशेष मोहीम’ हाती घेऊन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तांत्रिक त्रुटींची पूर्तता करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत २१ मार्च या दिवशी सदस्य अभिमन्यू पवार आणि अन्य सदस्य यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली.

सदस्य अभिमन्यू पवार म्हणाले की, ही योजना मागील काळात चालू झाल्यानंतर केंद्र सरकारकडून त्याविषयी कृषी अधिकार्‍यांचा गौरवही करण्यात आला आहे; मात्र त्यानंतरच्या काळात या योजनेत अनुमाने ७ लाखांहून अधिक लाभार्थींच्या तांत्रिक त्रुटीमुळे ते योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित झाले आहेत. (तांत्रिक त्रुटींमागे काही मानवी चुकाही आहेत का, हेही पहायला हवे ! – संपादक)

त्या संदर्भात माहिती देतांना कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले की, ही योजना प्रभावीपणे राबवण्यात यावी, तसेच अधिकाअधिक शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळावा, तसेच त्रुटी दूर करण्यासाठी ‘विशेष मोहीम’ राबवण्यात येणार आहे.