बीड नगरपालिकेच्या ४ अधिकार्‍यांचे निलंबन !

  • लक्षवेधीवरील माहिती देण्यासाठी अनुपस्थिती

  • मुख्याधिकार्‍यांची होणार विभागीय चौकशी !

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – विधान परिषदेत लक्षवेधी लागली असूनही त्याविषयी मंत्र्यांना माहिती देण्यासाठी उपस्थित न राहिल्यामुळे बीड नगरपालिकेच्या ४  अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी २१ मार्च या दिवशी विधान परिषदेत कारवाईची घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौर्‍याच्या वेळी सूचना पाठवूनही बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी लावण्याची घोषणा या वेळी तनपुरे यांनी केली.

राहुल टाकले, योगेश हांडे, सुधीर जाधव आणि सलीम सय्यद याकूब अशी निलंबित अधिकार्‍यांची नावे आहेत. आमदार विनायक मेटे यांची बीड येथील नगरपालिकेच्या विविध प्रश्नांवरील लक्षवेधी २१ मार्च या दिवशी विधान परिषदेत चर्चेला येणार होती. या लक्षवेधीवर नगरविकासमंत्र्यांना सभागृहात उत्तर द्यायचे होते; मात्र त्याविषयीची माहिती देण्यासाठी संबंधित अधिकारी विधीमंडळात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. कोरोनाच्या कालावधीत बीड नगरपालिकेच्या क्षेत्रात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या वेळी मुख्याधिकारी दूरभाष करूनही उपस्थित राहिले नसल्याची माहिती सभागृहात दिली. यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्याधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर मंत्र्यांनी कारवाईची घोषणा केली.