बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मुसलमान विद्यार्थिनी हिजाब न घालता शाळेमध्ये येण्यास नकार देत आहेत. यामुळे आता राज्य सरकारने कठोर भूमिका घेत प्रयोग परीक्षेला उपस्थित न रहाता हिजाबच्या समर्थनार्थ निदर्शने करणार्या विद्यार्थिनींना पुन्हा परीक्षा देण्याची संधी न देण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी मासात काही विद्यार्थिनींनी हिजाबच्या समर्थनार्थ प्रयोग परीक्षेवर बहिष्कार घातला होता. कर्नाटकमध्ये शिक्षण मंडळाच्या परीक्षेत प्रयोग परीक्षेला ३० गुण असतात, तर ७० गुणांची लेखी परीक्षा असते. त्यामुळे प्रयोग परीक्षेवर बहिष्कार टाकणार्या विद्यार्थिनींनची आता थेट ३० गुणांची हानी होणार आहे.
‘No’ 2nd chance for students who skipped PU exams over Hijab stir https://t.co/7cvUTZisOm #Hijab
— Oneindia News (@Oneindia) March 21, 2022
कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी परीक्षेच्या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आम्ही पुन्हा परीक्षा घेण्याच्या शक्यतेवर विचार तरी कसा करू शकतो ? हिजाब परिधान करण्यासाठी परीक्षेवर बहिष्कार घालणार्या विद्यार्थिनींना आम्ही उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतरही पुन्हा संधी दिली, तर उद्या अन्य विद्यार्थी दुसरे कारण काढून परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करतील. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेणे अशक्य आहे; मात्र शालेय स्तरावर घेण्यात येणार्या ८ वी, ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेची संधी दिली जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.