महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या आंदोलनामुळे राज्यात ६० टक्के शस्त्रकर्मे थांबली !

शस्त्रकर्मे थांबणे म्हणजे जनतेचा जीव धोक्यात घालणे होय ! प्रशासनाने संवेदनशील विषय तातडीने सोडवल्यास संघटनांवर अशी कृती करण्याची वेळ येणार नाही.

प्रतिकात्मक छायाचित्र

लातूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी प्राध्यापकांना सेवेत नियमित करून घेण्यात यावे आणि त्यांचे समावेशन करण्यात यावे, वैद्यकीय अध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे सातव्या वेतन आयोगातही आश्वासित प्रगती योजना केंद्र अन् इतर राज्यांप्रमाणे लागू करण्यात यावी, यांसह विविध मागण्यांसाठी राज्यातील वैद्यकीय शिक्षकांनी १४ मार्चपासून रुग्णसेवेवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नियमित होणारी ६० टक्के शस्त्रकर्मे थांबली आहेत. शस्त्रकर्मासाठी आलेल्या रुग्णांना परत पाठवण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

एम्.एस्.एम्.टी.ए.चे (महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना) राज्याध्यक्ष डॉ. उदय मोहिते यांनी सांगितले की, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत सचिव आणि सहसंचालक यांच्या समवेत बैठक झाली असून त्यामध्ये शिक्षणमंत्र्यांनी मागण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. अस्थायी प्राध्यापकांचा प्रश्न प्रलंबित आहे; मात्र यासंदर्भात लेखी आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे अद्याप आंदोलन मागे घेण्यात आले नाही. सध्या राज्यात ६० टक्के शस्त्रकर्मे थांबली आहेत.

निवासी आधुनिक वैद्यांवर अतिरिक्त ताण

या आंदोलनामुळे लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिदिन होणारी ३० शस्त्रकर्मे थांबली आहेत. अशीच स्थिती राज्यातील अन्य वैद्यकीय महाविद्यालयात आहे. एम्.एस्.एम्.टी.ए.च्या आंदोलनामुळे येथील जवळपास ७० वैद्यकीय शिक्षकांनी रुग्णसेवेवर बहिष्कार टाकला आहे. येथे प्रतिदिन बाह्यरुग्ण विभागात १ सहस्र ३०० रुग्णांची नोंदणी होत असते. या रुग्णांची पडताळणी करून औषधोपचार देण्याचा ताण निवासी आधुनिक वैद्य आणि पदव्युत्तरच्या आधुनिक वैद्यांवर पडला आहे.