नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री !
मुंबई – आर्थिक अपव्यवहार आणि कुख्यात आतंकवादी दाऊदशी आर्थिक लागेबांधे असल्याच्या कारणावरून न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सुटकेसाठी दुबई येथून दूरभाष आला आहे, अशी माहिती उघड झाली आहे. नवाब मलिक यांचा मुलगा आमीर मलिक याने या संदर्भात येथील पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
या तक्रारीनुसार आमीर मलिक यांना दुबई येथून एका व्यक्तीचा दूरभाष आला होता. ‘नवाब मलिक यांना जामीन हवा असल्यास ३ कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल’, असे संबंधित व्यक्तीने म्हटले, तसेच ‘हे पैसे ‘बिटकॉईन’च्या स्वरूपात द्यावेत’, अशी मागणीही संबंधित व्यक्तीने केल्याचे समजते. या व्यक्तीचे नाव इम्तियाज असल्याचे समजते. आमीर मलिक यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक अन्वेषण केले. त्या वेळी संबंधित दूरभाष दुबई येथून आल्याचे स्पष्ट झाले.
मंत्री राजेश टोपे आणि धनंजय मुंडे यांच्यावर नवाब मलिक यांच्या खात्यांचे अतिरिक्त दायित्व !
मुंबई येथील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक १७ मार्च या दिवशी पार पडली. आघाडी सरकारने नवाब मलिक यांचे त्यागपत्र घेतले नसले, तरीही त्यांच्याकडे असलेल्या विभागाचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यांपैकी अल्पसंख्यांक खात्याचा कारभार गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, तर कौशल्य विकास खात्याची धुरा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तसेच मलिक यांच्याकडील परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे, तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.