मुंबई – येथील पोलिसांकडून शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात मुंबई येथे ५ किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. याशिवाय, मोर्चा, मिरवणूक, वरात आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरही पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. शहरात कोणत्याही भागात ‘ड्रोन’ उडवण्यासही पोलिसांनी मनाई केली आहे. ‘पोलिसांनी अचानक जवळपास २० दिवसांची जमावबंदी का लागू केली ?’, असा प्रश्न विचारला जाऊ लागला; परंतु हा निर्णय केवळ शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घेण्यात आला आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
यामध्ये विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, सहकारी संस्था, अन्य संस्थांच्या बैठका आणि क्लबमध्ये होणार्या बैठकांना वगळण्यात आले आहे, तसेच चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सार्वजनिक मनोरंजनाची ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, आस्थापने, कारखाने, दुकाने, नियमित व्यापार आणि व्यवसाय या कारणांनी होणार्या गर्दीवरही कोणतेही निर्बंध नसतील.