‘काही वेळा साधकांना काही शारीरिक आजार किंवा मानसिक समस्या यांना सामोरे जावे लागते. ‘उपचार चालू असतांना अथवा उपचारांतून अपेक्षित लाभ होत नसल्यास साधक त्याविषयी नकारात्मक विचार करत रहातात. त्याचप्रमाणे साधकांकडून त्याविषयी वारंवार इतरांना सांगितले जाते. स्वतःच्या समस्यांविषयी विचार करत रहाण्याने, तसेच त्यांविषयी इतरांना सतत सांगितल्याने मनाला नकारात्मक स्वयंसूचना दिल्याप्रमाणे होते. परिणामी मनातील नकारात्मक विचारांचे पोषण होऊन मनाची अस्थिरता वाढते आणि कार्यक्षमता न्यून होते.
१. साधकांना स्वतःचे आजारपण अथवा समस्या यांविषयी सांगायचे असल्यास त्यांनी आधुनिक वैद्य अथवा मानसोपचार तज्ञ यांच्याशी बोलावे. त्यामुळे त्यांना योग्य उपाययोजना मिळू शकतात.
२. यासमवेत साधकांनी आध्यात्मिक स्तरावरील उपायही करावेत, उदा. मनात येणारे सर्व नकारात्मक विचार कागदावर लिहून त्याभोवती नामजपाचे मंडल घालावे.
३. साधकांनी आपल्या समस्यांसाठी मार्गदर्शन घेण्यासह वस्तूस्थिती स्वीकारता यावी, यासाठी मनाला स्वयंसूचना देणेही आवश्यक आहे. काही वेळा साधकांना आधुनिक वैद्यांकडून सांगितले जाते की, त्यांचे एखादे दुखणे (उदा. गुडघेदुखी / पाठदुखी) पूर्णपणे बरे होण्याची शक्यता अल्प आहे. त्या वेळी साधकांचे मन ही वस्तूस्थिती स्वीकारत नाही. ती स्वीकारता येण्यासाठी आणि मनाची स्थिरता वाढवण्यासाठी साधकांनी पुढे दिल्याप्रमाणे स्वयंसूचना घ्यावी.
‘जेव्हा मी माझ्या ……….. समस्येविषयी कुटुंबातील सदस्य / साधक / उत्तरदायी साधक यांच्याशी वारंवार बोलत असेन, तेव्हा मला जाणीव होईल की, यामुळे माझ्या मनाची नकारात्मकता आणि अस्वस्थता वाढत आहे, तसेच इतरांची ऊर्जा अन् वेळही वाया जात आहे. त्यामुळे मी योग्य तज्ञांचे साहाय्य घेईन आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न करीन.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२२)