कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आक्रमणकर्ते नेमके कोण आहेत ?, हे अन्वेषण यंत्रणेने अगोदर निश्चित करावे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, यासाठी कोल्हापूर येथील न्यायालयात युक्तीवाद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

कोल्हापूर, १५ मार्च (वार्ता.) – कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सर्वांत आधी पोलिसांचा असा दावा होता की, कॉ. पानसरे यांच्या घरासमोरच्या चिंचोळ्या रस्त्यावर गाडीवरून आलेल्या २ जणांनी कॉ. पानसरे दांपत्यावर गोळ्या झाडल्या. त्यांतील गोळ्या झाडणारा एक संशयित म्हणून पोलिसांनी समीर गायकवाड यांना अटक केली. ‘त्याच्यासमवेत अन्य आरोपी कोण होता ?’, ते अज्ञात आहे. त्यापुढच्या अन्वेषणात पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्यावर पोलिसांनी या प्रकरणी सारंग अकोलकर आणि विनय पवार हे दोघे आरोपी असल्याचे सांगितले, तर त्यापुढच्या अन्वेषणात वासुदेव सूर्यवंशी गाडी चालवणारा आणि सचिन अंदुरे यांनी गोळ्या झाडल्या; म्हणून त्यांना अटक केली. त्यामुळे कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात अन्वेषण यंत्रणेने ‘नेमके आक्रमणकर्ते कोण ?’, ते अगोदर निश्चित करावे, असा युक्तीवाद अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता  करावी, या मागणीसाठी ते युक्तीवाद करत होते. ही सुनावणी कोल्हापूर येथे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्यासमोर चालू असून पुढील सुनावणी २५ मार्च या दिवशी होणार आहे. या वेळी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनीही युक्तीवाद केला. या प्रकरणात अटक केलेले अन्य संशयित यांना मुंबई, पुणे, तसेच बेंगळुरू येथील कारागृहातून ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे जोडले होते.

युक्तीवादात अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, कॉ. पानसरे प्रकरणात प्रारंभी समीर गायकवाड यांनी गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावा !

वर्ष २०१५ मध्ये या प्रकरणात जेव्हा पहिल्या टप्प्यात अन्वेषण करण्यात आले, तेव्हा या प्रकरणात प्रत्यक्ष आरोपी म्हणून दोघेच होते, असे पोलीस सांगत होते. त्यातील पहिला संशयित म्हणून गोळी झाडणारा म्हणून पोलिसांनी समीर गायकवाड यांना अटक केली. त्याला ओळखल्याच्या काही साक्षीही पोलिसांनी त्या वेळी दाखवल्या. यातील दुसरा आरोपी कोणता ? हे अद्याप समोर आलेले नाही.

दुसर्‍या अणि तिसर्‍या अन्वेषणात वेगळ्याच आरोपींनी गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावा!

या प्रकरणात पुढच्या अन्वेषणात दोन वेगळ्याच आरोपींची नावे घेऊन ते दोघे सारंग अकोलकर आणि विनय पवार असल्याचे यंत्रणा सांगत आहेत. पुढच्या अन्वेषणात वासुदेव सूर्यवंशी गाडी चालवणारा आणि गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे आहे, असे सांगत आहेत. त्यामुळे पोलिसांनीच सादर केलेल्या अन्वेषणातून प्रत्येक वेळी गोळ्या झाडणारा संशयित वेगवेगळा आहे, असेच समोर येत आहे.

हे अशा प्रकारे अन्वेषण कसे काय होऊ शकते ? ज्याप्रकारे ‘कॉम्प्युटर सॉफ्टवेअर’चे पुढचे पुढचे भाग येतात.’ त्याचप्रकारे अन्वेषणाचे पुढचे पुढचे भाग कसे काय असू शकतात ? पोलीस प्रत्येक वेळी गोळ्या झाडणारा आरोपी पालटत आहेत, हे कसे काय होऊ शकते ? त्यामुळे एकूणच हे संपूर्ण अन्वेषण संशयास्पद आहे.

प्रत्येक वेळी उच्च न्यायालयाचे नाव सांगून दबाव निर्माण करण्याचा अन्वेषण यंत्रणांचा प्रयत्न !

या प्रकरणाचे अन्वेषण करणारे विशेष पोलीस पथक प्रत्येक वेळी या प्रकरणाचे अन्वेषण उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली असल्याचे सांगते. प्रत्यक्षात अन्वेषण पथकाने उच्च न्यायालयासमोर काय सादर केले, ते अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रत्येक वेळी उच्च न्यायालयाचे नाव सांगून अन्वेषण पथक एकप्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

अटक केलेल्या संशयितांनी आणखी किती वर्षे अशाच प्रकारे काढायची ?

या प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित समीर गायकवाड हे २२ मास कारागृहात होते. आताही त्यांना प्रत्येक रविवारी हजेरी लावण्यासाठी कोल्हापूर येथे पोलीस ठाण्यात यावे लागते. ते महाराष्ट्र सोडून बाहेर जाऊ शकत नाहीत. अद्यापही पोलिसांच्या लेखी ते गुन्हेगारच आहेत. त्यामुळे आणखी किती वर्षे अशा प्रकारे त्यांनी काढायची ?

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासारखे नाक-कान-घसा तज्ञ हे गेली ७ वर्षांहून अधिक काळ कारागृहात आहेत. उद्या या प्रकरणातील सर्व आरोपी जर १०-१५ वर्षांनंतर निर्दाेष सुटले, तर सर्वांना कारागृहात खोट्या आरोपांखाली रहावे लागले, त्याचे दायित्व कोण घेणार ?

कोल्हापूरकरांनी खोट्या आरोपाखाली निष्पाप लोकांवर अन्याय होऊ देऊ नये ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

युक्तीवादानंतर पत्रकारांशी बोलतांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘केवळ साम्यवादी असणार्‍या कॉ. पानसरे यांची हत्या झाली; म्हणून १०-१२ हिंदुत्ववाद्यांना खोट्या आरोपाखाली आपण किती काळ कारागृहात सडवत ठेवणार आहोत ? असे करणे, हे १२ जणांची न्यायालयीन हत्या केल्यासारखे आहे. पोलीस यात निश्चित काहीतरी चुकीचे करत आहेत. केवळ एक महत्त्वपूर्ण खटला आहे, लोकांच्या भावना आहेत, त्याचे वृत्त प्रसिद्धीमाध्यमात येते; म्हणून काही जण कारागृहात सडले, तरी चालेल, असे होता कामा नये. त्यामुळे या प्रकरणात दोषारोपपत्र कसे प्रविष्ट होणार, हे प्रश्नचिन्ह आहे. तरी कोल्हापूरकरांनी खोट्या आरोपाखाली निष्पाप लोकांवर अन्याय होऊ देऊ नये, असे आवाहन या निमित्ताने मी करत आहे.’’

युक्तीवादात अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी विविध खटले आणि निकाल यांचे संदर्भ दिले. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या काही लोकांना अटक केली. पुढे या प्रकरणाचे अन्वेषण न्यायालयाने स्वत:च्या कह्यात घेतले आणि हे प्रकरण पुढील अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे दिले. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने अन्वेषण केल्यावर यात दुसरेच आरोपी सापडले. या प्रकरणी निर्दाेष आरोपींना अटक केल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण पथकाने पुणे येथील अन्वेषण अधिकारी यांना अटक केली होती.

सचिन अंदुरे यांनी गोळ्या झाडल्याचा कोणताही सबळ पुरावा आतापर्यंत पोलिसांनी दिलेला नाही ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

या वेळी युक्तीवाद करतांना अधिवक्ता समीर पटवर्धन म्हणाले, ‘‘या प्रकरणात अटक केलेले सचिन अंदुरे यांनी गोळ्या झाडल्या, असा कोणताही सबळ पुरावा पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केलेला नाही. सचिन अंदुरे यांना कोल्हापूर येथे कोणत्याही साक्षीदाराने पाहिल्याचाही पुरावा पोलिसांनी दिलेला नाही. केवळ एका साक्षीदाराच्या सांगण्यावरून पोलिसांनी सचिन अंदुरे यांना अटक केली आहे. या प्रकरणात विविध दुचाकी गाड्यांचा पोलीस सातत्याने उल्लेख करत आहेत, त्यांतील एकही गाडी अद्याप पोलिसांनी जप्त केलेली नाही. समीर गायकवाड यांना जामीन देतांना जिल्हा न्यायालयाने ‘समीर गायकवाड यांच्या विरोधात यंत्रणेकडे कोणताही ठोस पुरावा नाही’, असे निरीक्षण नोंदवले आहे. त्याचप्रकारे सचिन अंदुरे यांनी गोळ्या झाडल्याचा कोणताही सबळ पुरावा आतापर्यंत पोलिसांनी दिलेला नसल्याने अंदुरे यांना खटल्यातून दोषमुक्त करावे.’’