साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती
आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. (पुढील आर्थिक वर्ष १.४.२०२२ ते ३१.३.२०२३ या कालावधीत आहे.)
‘टी.डी.एस्. (TDS – Tax Deducted At Source) कपात होऊ नये’, यासाठी पुढील आर्थिक वर्षासाठी 15G किंवा 15H यांपैकी एक फॉर्म भरून देण्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे दिल्या आहेत.
१. आर्थिक वर्षाच्या आरंभी सर्वांनी ‘अधिकोषात आपला पॅनकार्ड क्रमांक नोंदवला गेला आहे ना ?’, याची निश्चिती करावी. तो नोंदवला नसेल, तर ‘टी.डी.एस्.’ म्हणून २० टक्के रक्कम व्याजातून कापली जाते.
२. 15G फॉर्म : ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अल्प असेल आणि आर्थिक वर्षातील अंदाजित एकूण करपात्र उत्पन्न (एस्टिमेटेड टोटल टॅक्सेबल इन्कम) करमाफ मर्यादेपर्यंत असेल, तसेच अधिकोषाकडून मिळणार्या कायम ठेवीच्या व्याजाचे उत्पन्न २ लक्ष ५० सहस्र रुपयांपर्यंत असेल, त्यांनी हा फॉर्म भरावा.
३. 15H फॉर्म : ज्यांचे पूर्ण वय ६० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असेल अन् अंदाजित एकूण करपात्र उत्पन्न करमाफ मर्यादेपर्यंत असेल, त्यांनी हा फॉर्म भरावा.
४. दोन्ही फॉर्मविषयी सामायिक माहिती : विविध अधिकोषांत कायम ठेवी असतील, तर प्रत्येक अधिकोषात 15G अथवा 15H हे फॉर्म भरावे लागतात. एका अधिकोषाच्या एकापेक्षा अधिक शाखांमध्ये ठेवी असल्यास प्रत्येक शाखेत वेगळा फॉर्म भरून द्यावा लागतो.
15G अथवा 15H हे दोन्ही फॉर्म अधिकोषात अथवा पोस्टाच्या शाखेत उपलब्ध असतात. खातेधारकाला प्रत्येक फॉर्मच्या २ अथवा ३ प्रती (कॉपीज्) भरून अधिकोषात जमा कराव्या लागतात. एक प्रत अधिकोषाच्या संदर्भासाठी ठेवून दुसरी प्रत आयकर विभागाला पाठवण्यात येते. प्रत्येक अधिकोषाने स्वतःच्या नियमावलींच्या दृष्टीने दोन्ही फॉर्म्सच्या आराखड्यामध्ये (लेआऊटमध्ये) थोडेफार पालट केलेले असल्याने खातेधारकाचे ज्या अधिकोषात खाते आहे, तेथूनच फॉर्म्स आणून ते भरावे लागतात.
काही अधिकोषांकडून 15G अथवा 15H हे फॉर्म ‘ऑनलाईन’ भरण्याची सुविधा देण्यात येते. त्यासाठी संबंधित अधिकोषाचे ‘नेटबँकिंग’ असल्यास त्याद्वारेही या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. तसेच संबंधित अधिकोषांच्या संकेतस्थळावर हे फार्म्स उपलब्ध असतील, तर ते ‘डाऊनलोड’ करून त्याची ‘प्रिंट’ काढून त्यात सर्व माहिती भरून ते अधिकोषात जमा करू शकता.
५. ‘टी.डी.एस्.’ कपात झाल्यास करावयाची कृती : कापण्यात आलेल्या ‘टी.डी.एस्.’ची रक्कम खातेधारकाला परत हवी असल्यास ज्या आर्थिक वर्षात करकपात झाली, त्या वर्षाचे ‘आयकर विवरण पत्रक’ आयकर विभागाला सादर करावे लागते. आयकर विभाग खातेधारकाची माहिती पडताळून घेतो आणि कापलेला ‘टी.डी.एस्.’ व्याजासहित परत देतो.
ही सूत्रे लक्षात घेऊन ‘टी.डी.एस्. कपात होऊ नये’, यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वरील प्रक्रिया पूर्ण करावी.