‘२८.८.२०२१ या दिवशी मी सेवेनिमित्त देवद आश्रमात गेलो होतो. त्या वेळी गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझ्या मनात ‘पू. रत्नमाला दळवीताई यांच्याकडून शिकूया’, असा विचार घातला. पू. रत्नमालाताईंनी मला सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. देवाच्या अनुसंधानात राहून सेवा करावी !
मी पू. ताईंना ‘सेवा करतांना अनुसंधान कसे ठेवायचे ?’, याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘सेवा चालू करतांना प्रार्थना करावी. मी ‘ही सेवा मला परम पूज्यांकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे) घेऊन जाणारे माध्यम आहे’, असा भाव ठेवते. त्यामुळे मी सेवेचे चिंतन करते. सेवा समयमर्यादेत आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते.
सेवा करतांना मनात सेवेव्यतिरिक्त वेगळे विचार येत असल्यास त्यावर स्वयंसूचना घेऊन मात करावी आणि उपाययोजना काढावी. सेवा झाल्यावर ‘मनाला काय वाटले ? सेवेतून समाधान मिळाले का ?’, याचा अभ्यास करावा. सेवा केल्यानंतर अस्थिरता जाणवल्यास त्याचे कारण शोधावे आणि अस्थिरता दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत.’’
२. दायित्व घेऊन सेवा करतांना लक्षात घ्यायची सूत्रे
२ अ. समयमर्यादा ठेवून सेवेचे नियोजन करावे ! : मी ‘स्वतःची व्यष्टी साधना म्हणून समष्टी सेवेचे दायित्व सांभाळण्यासाठी नियोजन कसे करायचे ?’, हे पू. ताईंना विचारले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘समयमर्यादा ठेवून नियोजन करायचे आणि समयमर्यादा संपण्याच्या १५ दिवस आधी सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. सेवेचे नियोजन योग्य असल्यास अन्य सेवांवर परिणाम होत नाही.
२ आ. दायित्व घेऊन सेवा करतांना समोरच्या साधकाला आधी साहाय्य करावे आणि नंतर त्याला चूक सांगावी.’’
३. सहसाधकांना आधार देण्यासाठी त्यांच्याविषयीच्या अपेक्षा न्यून करून त्यांना समजून घ्यावे !
मी पू. ताईंना ‘साधकांना आधार वाटण्याच्या दृष्टीने काय केले पाहिजे ?’, याविषयी विचारल्यावर पू. ताई मला म्हणाल्या, ‘‘पूर्वी मला साधकांकडून अपेक्षा असायच्या. त्यांच्याविषयी मला असलेल्या अपेक्षांचे प्रमाण न्यून होण्यासाठी मी स्वयंसूचना सत्रे केली. आता मी त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवता सेवा करते. मी साधकांना समजून घेण्याचा भाग वाढवला, तसेच साधकाची चूक झाल्यास त्याचे कारण जाणून घेते आणि त्यांना सत्संगात चूक सांगण्यास सांगते. आपल्याकडून ‘समोरची व्यक्ती जशी आहे, तशी स्वीकारणे’, जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपले स्वभावदोष उफाळून येत रहातात.’’
४. पू. रत्नमालाताईंनी सांगितलेली अन्य सूत्रे
४ अ. सेवेची सूत्रे स्मरणात ठेवण्यापेक्षा कागदावर नोंद करून ठेवावीत. सेवेच्या ठिकाणी एका वहीत सेवेसंबंधीचे निरोप लिहून ठेवावेत.
४ आ. सेवा करतांना ठेवायचा भाव
१. ‘मी सेवा करणार’, असे वाटत असेल, तर आपल्याकडून काहीच होणार नाही; पण ‘देव मला माध्यम बनवून सेवा करवून घेईल’, असा भाव असल्यास सेवा परिपूर्ण होईल.
२. ‘मला परात्पर गुरु डॉक्टरांचा आवडता शिष्य बनायचे आहे. त्यांना अपेक्षित असे घडायचे आहे’, असा भाव असायला हवा.
‘हे गुरुदेवा, पू. रत्नमालाताईंमधील गुण माझ्यात येण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ देत आणि आम्हाला त्यांच्याप्रमाणे भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करता येऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), देहली (६.३.२०२२)