काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांचे सत्य सर्वांपर्यंत पोचायला हवे ! – दर्शन कुमार, अभिनेता

दर्शन कुमार

पुणे, १३ मार्च (वार्ता.) – काश्मिरी पंडितांवर (हिंदूंवर) झालेल्या अत्याचारांचे सत्य सर्वांपर्यंत पोचायला हवे. काश्मिरी हिंदूंची हत्या करणारा एक दहशतवादी मुलाखतीत सहजतेने म्हणतो की, ‘मी २५ माणसांना मारले.’ ही सत्यता ‘द कश्मीर फाइल्स’मध्ये दाखवण्यात आली आहे. चित्रपटात जे काही दाखवले आहे, त्याचे पुरावे सार्वजनिक माध्यमांत उपलब्ध आहेत. नागरिकांना हवी असणारी माहिती चित्रपटातून मिळत आहे. त्यामुळे चित्रपटाला पुष्कळ पसंती मिळत आहे, असे प्रतिपादन ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे अभिनेता दर्शन कुमार यांनी केले. १२ मार्च या दिवशी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या.

काश्मीरमध्ये झालेल्या नरसंहारातील ७०० हून अधिक पीडितांच्या अनुभवकथनाचे व्हिडिओज पाहिल्यानंतर मी नि:शब्द झालो ! – दर्शन कुमार

काश्मीरच्या नरसंहाराविषयी अभ्यास करतांना मला ७०० हून अधिक पीडितांच्या अनुभव कथनाचे व्हिडिओज पहायला मिळाले. ते पाहून मी नि:शब्द झालो. या पीडितांच्या आई-बहिणींवर अमानुष अत्याचार झाले. ‘काश्मिरी हिंदूंच्या बायका आम्हाला हव्या आहेत’, अशा पद्धतीच्या घोषणा त्या वेळी देण्यात आल्या. अन्य भारतियांप्रमाणे मला याची काहीच माहिती नव्हती. मागील ३२ वर्षांपासून काश्मिरी पंडित हे अतिशय भयाण दु:ख भोगत होते. या चित्रपटामुळे त्यांचे दु:ख निश्चितच अल्प होईल आणि यांचे सत्य जगाला कळेल.