गुरुसेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील कै. (सौ.) सुनंदा सुरेश वाटवे (वय ७२ वर्षे) !

‘कोथरूड, पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. सुनंदा सुरेश वाटवे (वय ७२ वर्षे) यांचे पौष शुक्ल पक्ष नवमी (११.१.२०२२) या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या मागील २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होत्या. त्या ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार बनवणे आणि वितरण करणे, ग्रंथ वितरण करणे, ग्रंथप्रदर्शन कक्ष लावणे, सनातन पंचांगांचे वितरण करणे, अशा सेवा करत असत. ११.३.२०२२ या दिवशी असलेल्या त्यांच्या द्वितीय मासिक श्राद्धानिमित्त पुणे येथील साधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कै. (सौ.) सुनंदा वाटवे

सौ. प्रीती कुलकर्णी

१. गुरुसेवेची तीव्र तळमळ असणे

१ अ. विविध सेवांमध्ये मनापासून सहभागी होणे : ‘सौ. वाटवेकाकू प्रत्येक सेवा मनापासून करत असत. ‘गुरुदेवांनी दिलेल्या प्रत्येक सेवेत स्वतःचा सहभाग हवा’, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे वयस्कर असूनही त्या विविध सेवांमध्ये सहभागी होत असत. त्या प्रतिवर्षी पुष्कळ ३०० सनातन पंचांगांचे वितरण करत असत.

१ आ. दळणवळण बंदीच्या कालावधीतही सेवा चालू ठेवणे : दळणवळण बंदीमुळे आणि शारीरिक त्रासांमुळे काकूंना घराबाहेर पडून सेवा करता येत नव्हती. त्यांना याची पुष्कळ खंत वाटायची. तेव्हा काकूंनी साधकांकडून ‘भ्रमणभाष कसा हाताळायचा ?’, हे शिकून घेतले. त्या त्यांची नात आणि साधक यांचे साहाय्य घेऊन ‘ऑनलाईन’ सेवा करत असत. त्या भ्रमणभाषवरून ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे नूतनीकरण करणे, वाचकांना सनातनची नियतकालिके, सनातन पंचांग, ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने देणे इत्यादी सेवा त्यांच्या वाहनचालकाचे साहाय्य घेऊन करत होत्या.

१ इ. प्रतिकूल परिस्थितीत आनंदाने सेवा करणे : काकूंना वैयक्तिक अडचणी आणि शारीरिक त्रास असूनही त्यांनी त्याचा सेवेवर परिणाम होऊ दिला नाही. त्या शेवटपर्यंत हसतमुखाने आणि आनंदाने गुरुसेवा करत होत्या.

२. परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती दृढ श्रद्धा असणे 

काकूंची सनातन पंचांग वितरणाची सेवा पाहून मी काकूंना म्हणायचे, ‘‘काकू, तुम्ही इतक्या सनातन पंचांगांचे कसे वितरण करता ?’’ तेव्हा त्या म्हणायच्या, ‘‘मी काहीच करत नाही गं ! गुरुदेवच करवून घेतात.’’ यातून काकूंची ‘कर्ता-करविता गुरुदेव आहेत’, अशी दृढ श्रद्धा मला जाणवायची.

‘कै. (सौ.) काकूंचे सर्व गुण माझ्यातही येवोत आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होवो’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’

(२४.१.२०२२)

सौ. रश्मी नाईक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

१. नम्रता

‘माझी आणि वाटवेकाकूंची अनेक वर्षांपासून ओळख होती. त्यांचा स्वभाव नम्र आणि भोळा होता. त्या कधीही कुणाला उलट बोलल्या नाहीत. त्या इतरांच्या इच्छेनुसार वागायच्या.

२. स्वभावदोष निर्मूलनाचे प्रयत्न तळमळीने करणे

एकदा मी काकूंना त्यांच्यातील ‘मोठ्याने बोलणे’ या स्वभावदोषाची जाणीव करून दिली होती. त्यानंतर त्यांनी तो स्वभावदोष घालवण्यासाठी मनापासून प्रयत्न केले.

३. सेवेची तळमळ

काकू त्यांच्या नातेवाइकांच्या लग्नाच्या वेळी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावत. त्या मुलीकडे रहायला गेल्यावर तेथेही सर्वांना सनातन संस्थेच्या कार्याची माहिती सांगणे, सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, अशा सेवा करत.’

(१९.१.२०२२)

सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)

१. काकू तरुणांना लाज वाटावी, अशा उत्साहाने सेवा करायच्या.

२. आध्यात्मिक त्रासावर मात करून नामजप करणे

काकूंना नामजप करत असतांना पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत असे. त्या क्षात्रतेजाने त्रासावर मात करून नामजप पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असत.

३. स्वतःला पालटण्याची तळमळ

वर्ष २०१८ मध्ये आम्ही (मी आणि सौ. प्रीती कुलकर्णी) काकूंना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांनी त्यांच्या खोलीत एका फलकावर ‘उच्च लोकांमध्ये स्थान मिळवण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत ?’, त्याविषयी लिहिले होते. त्यांनी ‘व्यष्टी आणि समष्टी साधना’ या ग्रंथाचा अभ्यास करून गुणांची सूची केली होती. ‘त्या फलकाकडे पाहून प्रयत्नांना दिशा मिळेल’, असा त्यांचा भाव असायचा.

प.पू. गुरुमाऊली साधकांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्याकडून साधना आणि सेवा यांचे प्रयत्न करवून घेऊन त्यांचा उद्धार करत आहेत. धन्य ती गुरुमाऊली ! परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

(१९.१.२०२२)