मंगळुरूतील महाविद्यालयात झालेल्या ‘हिजाब’वरील वादावरून पोलिसांत ३ गुन्हे नोंद !
न्यायालयाचा आदेश डावलणार्या कायदाद्रोही धर्मांध विद्यार्थिनींनीही भविष्यात कायदा हातात घेऊन समाजाची शांतता भंग केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! – संपादक
मंगळुरू (कर्नाटक) – हिजाबच्या (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेल्या वस्त्राच्या) संदर्भात अंतिम निकाल येत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात गणवेश घालून यावे, असा उच्च न्यायालयाने निकाला दिला आहे. असे असतांनाही गेल्या आठवड्यात येथील एका महाविद्यालयामध्ये काही विद्यार्थिनींनी हिजाब घालून परीक्षा देण्याचा प्रकार समोर आला. ‘त्यांना त्यासाठी अनुमती कशी दिली गेली ?’, यावरून २ गटांमध्ये संघर्ष झाला. यानंतर काही विद्यार्थिनींनी त्यांच्या धार्मिक भावना दुखावणे आणि धमकावणे यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या १५ कार्यकर्त्यांसह अन्य काही विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंद केली. (‘स्वतः कायद्याचे पालन करायचे नाही आणि त्याची जाणीव कुणी करून दिल्यास त्यांच्या विरोधात तक्रार करायची’, हा धर्मांधांचा उद्दामपणा होय ! पोलिसांनी अशांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक) पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३ गुन्हे नोंदवले आहेत, अशी माहिती मंगळुरू शहर पोलीस आयुक्त एन्. शशी कुमार यांनी दिली.
शशी कुमार यांनी सांगितले की, पहिली तक्रार करणारी विद्यार्थिनी आणि अन्य ६ जण यांच्या विरोधात अन्य एका विद्यार्थिनीने तक्रार नोंदवली आहे. त्रास देणे आणि धमकावणे अशा प्रकारचे आरोप तक्रारदार विद्यार्थिनीने केले आहेत. तिसरा गुन्हाही या घटनेच्या संदर्भात आहे.