परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्णभक्तीत रमणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर यांना समष्टी रूपात श्रीकृष्ण पहायला शिकवत असतांना पू. (कु.) दीपाली यांच्या मनाची झालेली जडणघडण आणि त्यांनी अनुभवलेला कृष्णानंद !

नांदे श्रीहरि माझ्या मनी ।
मी असे अखंड त्याच्या चरणी ।।
भावाचा भुकेला माझा श्रीहरि ।
देई आनंद सदा माघारी राहूनी ।।
दिधला आनंद मज । घेतले स्वहृदयी सामावूनी ।।

‘२८.८.२०२१ या दिवशी सौ. उल्का जठारकाकूंनी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) मला सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी (प.पू. गुरुदेवांनी) ‘आज तुझे दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रसिद्ध झालेले छायाचित्र तुझ्या साधनेमुळे पूर्वीपेक्षा छान दिसत आहे’, असा निरोप दिला आहे आणि तुला खाऊ द्यायला सांगितले आहे.’’ तेव्हा मला कळलेच नाही. माझ्या मनात विचार आला, ‘मी तर काहीच केलेले नाही, तरी गुरुदेव किती कृपाळू आहेत. मला खाऊ देत आहेत.’ नंतर वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील यांनी निरोप दिला, ‘साधनेच्या दृष्टीने तुझे छायाचित्र छान दिसत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या संदर्भात तुला लवकर लेख पाठवायला सांगितला आहे.’

‘परम प्रिय, कृपाळू गुरुमाऊली, आपण दिलेल्या निरोपानंतर माझ्या लक्षात आले की, तुमची ही कृपा समजून घेण्यास मी अज्ञानी आहे. मी तुमच्या चरणी शरण आले आहे. ‘माझ्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचा लवलेशही राहू नये. आपल्याला अपेक्षित असे होऊन तुमच्या चरणी अर्पण व्हावे आणि तुम्हीच तुम्हाला अपेक्षित असे लिखाण माझ्याकडून करवून घ्यावे’, अशी तुमच्या पावन चरणकमली प्रार्थना !’

‘संत होण्यापूर्वी कु. दीपाली मतकर हिने कशी वाटचाल केली’, हे या लेखावरून लक्षात येईल. सनातनमध्ये ११७ संत आहेत. त्यांपैकी एकाही संतांनी आणि मीही ‘आमची वाटचाल कशी झाली?’, यासंदर्भात विशेष काही लिहिले नाही. ते लिखाण कु. दीपाली मतकर हिने या लेखातून पूर्णत्वाला नेले आहे. या लेखामुळे ‘साधना कशी करायची?’, हे साधकांना आणि ‘यासंदर्भातील लिखाण कसे करायचे?’, हे संतांनाही शिकायला मिळेल. या लेखासंदर्भात दीपालीचे कौतुक किती करावे, तेवढे थोडे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.२.२०२२)

मागिल भागाची लिंक : https://sanatanprabhat.org/marathi/559273.html

७. मनाची स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न आणि झालेले पालट

७ अ. मनमोकळेपणा आणि सहजता वाढणे : पुढे मी सत्संगामध्ये स्वतःच्या चुका सांगू लागले. सद्गुरु स्वातीताईंनाही स्वतःच्या चुका सांगण्याचा प्रयत्न गुरुकृपेने करू लागले. त्यामुळे गुरुदेवा, तुम्हीच प्रतिदिन माझ्या मनाची स्वच्छता करवून घेतलीत. त्यामुळे मनाची घुसमट अल्प झाली. चुका सांगणे चालू झाल्यावर माझ्यात मनमोकळेपणा आणि सहजता वाढली.

७ आ. पूर्वी केवळ स्वतःच्या सेवा आणि कृष्ण अशी साधना होणे अन् समष्टी साधना करतांना सर्वत्र कृष्णतत्त्व अन् गुरुतत्त्व पाहिले जाणे : पूर्वी ‘स्वतःच्या सेवा आणि कृष्ण’ असेच माझे विश्व असायचे. सेवा करतांना ‘कृष्णाशी बोलणे आणि त्याला सर्वकाही सांगणे’ असे असायचे; पण ‘आता सर्वत्र कृष्णतत्त्व आणि गुरुतत्त्वच कार्यरत आहे. त्यामुळे सगळ्यांकडे पाहिल्यावर हेच माझे सर्वस्व आहे’, असा माझा भाव असतो. ‘साधक, वाचक, धर्मप्रेमी आणि आश्रमातील प्रत्येक वस्तू यांमध्ये गुरुदेवच आहेत’, हे मला पहाता येऊ लागले आहे. या सार्‍यांवर भरभरून प्रेम करणे, म्हणजेच कृष्णाची भक्ती करणे’, असे प्रयत्न करण्यास आरंभ झाला.

७ इ. ‘स्वतःला घडवायचे आहे’, या विचारातून प्रयत्न झाल्याने सर्व स्वीकारता येऊन आनंद अनुभवता येणे : आता ‘नियोजनात जे ठरवले आहे, त्याप्रमाणे मला करायचे आहे. त्यातील आनंद मला घ्यायचा आहे. त्यातून शिकायचे आहे आणि मला साधनेसाठी घडायचे आहे’, या दृष्टीने प्रयत्न झाल्यामुळे मला आनंदात रहाता येऊ लागले. काही पालट झाल्यास ‘गुरुदेवांनी जसे नियोजन दिले आहे, तसे नियोजन मला करायचे आहे’, असा भाव ठेवला. त्यामळे ती परिस्थिती स्वीकारता येऊन मला आनंद अनुभवता येऊ लागला.

७ ई. श्रीकृष्णाच्या समष्टी रूपाच्या समवेत आनंद मिळू लागणे : नंतर ‘हे अवतीभोवतीचे साधकच कृष्ण आहेत’, असे कधी झाले, ते मला कळलेच नाही. कृष्णाच्या एका रूपाशीच बोलण्यातल्या आनंदापेक्षा या व्यापक समष्टी रूपाच्या समवेत आनंद मिळू लागला.

७ उ. उत्तरदायी साधकांशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे त्यांच्यातील गुण पहाता येऊन एकमेकांमधील दरी नष्ट होणे : पुढे उत्तरदायी साधकांशी बोलल्यामुळे साधक आणि माझ्यातील दरी पूर्णतः नष्ट झाली. मनातील दूषितपणा पूर्णतः नाहीसा झाला. त्यांच्यात गुरुरूप पहाता येऊन माझ्या मनात त्यांच्याविषयी अपार कृतज्ञताभाव भरून आला. मला त्यांच्यातील सर्व दैवी गुणांचे दर्शन होऊ लागले. प्रत्येक गोष्ट, मनाची स्थिती आणि अडचणी त्या त्या प्रसंगानंतर मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलता येऊ लागल्या. ‘गुरुदेवा, या प्रसंगांतून तुम्ही पुष्कळ शिकवलेत. यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अपुरीच आहे.’

७ ऊ. पूर्वी मनाविरुद्ध प्रसंग घडल्यास रामनाथीला जाण्याचा विचार येणे; मात्र नंतर सोलापुरात रामनाथी आश्रम सिद्ध करण्याचा सकारात्मक विचार होणे : यापूर्वी काही मनाविरुद्ध प्रसंग घडल्यास किंवा चुका झाल्या की, ‘आपण रामनाथी आश्रमात जाऊया’, असा विचार यायचा. ‘आता इथेच रामनाथी आहे. सोलापूर जिल्ह्यातच रामनाथी आश्रम सिद्ध करायचा आहे’, असा विचार होऊ लागला.

७ ए. सर्व वयांच्या साधकांबद्दल आईच्या ममतेने प्रेम वाटू लागणे : आता वयाने मोठे असलेले साधक आणि वयाने माझ्यापेक्षा लहान असलेले साधक यांच्याविषयी माझ्या मनात पुष्कळ प्रेम दाटून येते. हे ‘सर्व साधक म्हणजे मला गुरुदेवांनी दिलेली लहान बाळेच आहेत’, असे वाटून त्यांच्याविषयी पुष्कळ प्रेम वाटते. कोणाविषयी मनात काहीच राहिले नाही. सगळ्यांकडे पाहिले की, भरभरून प्रेमच वाटते. कोणाकडून काहीतरी राहिले, तर उगाच चिडचिड न होता ‘त्यांना कसे साहाय्य करू ?’, हाच भाग रहातो. गुरुमाऊली ही सारी आनंददायी लीला/कृपा तुम्हीच रचली आहे अन् मला आनंद देत आहात.

८. समष्टी स्तरावर झालेले लाभ

८ अ. सेवेत चुका झाल्यास त्यातून वाईट वाटण्याचा भाग अल्प होऊन त्यातून शिकण्याचा प्रयत्न वाढणे : सेवा करतांना काही चुका झाल्या, तर आधी भावनाशील व्हायचे आणि वाईट वाटायचे; पण नंतर ‘यात कसे प्रयत्न करूया ?’, असा विचार होऊ लागला. ‘सर्वकाही गुरुदेवच करवून घेत आहेत’, असा विचार होऊ लागला. त्यानंतर ‘समष्टीला आणखी आनंद कसा देता येईल?’, असे प्रयत्न होऊ लागले.

८ आ. साधक आणि साधिका यांचे व्यष्टी-समष्टी नियोजन करवून घेतल्यामुळे त्यांचा ताण अल्प होऊन त्यांच्याकडून सेवेसाठी वेळ दिला जाणे : काही साधक ‘वेळच नाही’, असे म्हणायचे. त्यामुळे त्यांची समष्टी सेवा आणि दैनंदिन वैयक्तिक सेवा यांच्या नियोजनाविषयी चिंतन करवून घेऊन त्यांचे नियोजन केले गेले. साधिकांना प्रतिदिनचे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे नियोजन करून दिले गेले. साधिकांना ‘अल्प वेळेत घरातील सेवा पूर्ण होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, ते सांगितले गेले. उदा. भाजी शिजत ठेवली, तर तेवढ्या वेळेत खण, शीतकपाट आणि स्वयंपाक खोलीतील अन्य आवरणे, असे केल्यास यासाठी वेगळा वेळ द्यावा लागणार नाही, हे सांगितले. त्यामुळे  ‘स्वतःचा कितीतरी वेळ व्यष्टी आणि समष्टी साधनेला देता येऊ शकतो’, हा भाग बर्‍याच साधकांच्या लक्षात येऊ लागला आणि साधकांचे नियोजन तणावविरहित होऊ लागले. त्यामुळे मलाही आनंद वाटू लागला. त्या वेळी ‘गुरुदेव, तुम्हीच मला त्यांच्या स्थितीला घेऊन जात होतात’, असे वाटले.

८ इ. अन्य जिल्ह्यांतील दायित्व असणार्‍या साधकांशी प्रसारसेवेतील त्यांच्या प्रयत्नांविषयी बोलून त्यातून शिकता येणे : प्रसाराच्या सेवेसाठी कसे प्रयत्न करायचे ? यासाठी अन्य जिल्ह्यांतील दायित्व असणारे साधक कसे प्रयत्न करत आहेत ? हे दायित्व असणार्‍या साधकांशी बोलून इथेही तसे करण्यासाठी प्रयत्न चालू केल्याने आनंद मिळू लागला. त्यामुळे साधकांकडून पुष्कळ शिकता आले. त्यामुळेही उत्साह वाढला. तसे केल्यावर भगवंत आणखी पुढील प्रयत्न सुचवायचा. त्यामुळेही पुष्कळ आनंद मिळू लागला.

८ ई. सर्व साधकांमध्ये भगवंताचे रूप पाहून त्यांच्याप्रती प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होऊन ‘साधकांना आनंद मिळावा’, याचा ध्यास लागणे आणि त्यातून प्रेमभाव वाढणे : ‘हे गुरुमाऊली, माझे सर्वस्व साधकरूपी भगवंतच आहे’, असे वाटून आता या साधकरूपी भगवंताप्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली आहे. माझ्याकडून त्या समष्टी भगवंताच्या चरणी सूक्ष्मातून नमस्कार केला जायचा. त्यांनाच मला तुमची सेवा कशी करायची, हे शिकवा’, अशी प्रार्थना व्हायची. ‘गुरुमाऊली मला सातत्याने समष्टी रूपातूनच शिकवत आहे’, असा विचार मनात येऊन आनंद घेता येऊ लागला. प्रत्येक साधकाशी बोलतांना ‘सेवेचे आणखी चांगले प्रयत्न कसे करूया ?’, यासाठी दिशा मिळू लागली. ‘साधकांना आनंद मिळेल, असे काय करूया ?’, हाच ध्यास लागल्याने आता मनात अन्य कोणतेच विचार रहात नाहीत. ‘काही झाले, तरी साधकांना साहाय्य कसे करता येईल ? प्रसारातील सर्वांना सत्संग कसा मिळेल ? चांगले प्रयत्न करणारे वाचक, हितचिंतक आणि युवासाधक यांना सद्गुरु स्वातीताईंचा सत्संग मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न कसे वाढतील ?’, असा विचार होऊ लागला. ‘त्यांना आनंद झाला की, माझा आनंद आपोआप वाढत असे. वेगळे काहीच करावे लागत नाही’, हे मी अनुभवले. आता सगळ्यांविषयी सतत प्रेमच वाटते.

‘गुरुमाऊली, आपल्या कृपेनेच मला हे लिखाण करता आले. ‘काही राहिले असल्यास सांगावे’, हीच आपल्या चरणी शरणागतीने प्रार्थना ! ‘गुरुमाऊली, हे सगळे तुम्हीच मला अनुभवण्यास दिले’, याबद्दल तुमच्या पावन चरणकमली कोटीशः कृतज्ञता. या दगडाला तुमच्या पावन चरणांचा स्पर्श झाला; म्हणून आनंद झाला’, असेच मला वाटते.

गुरुदेवा, किती आनंददायी कृपा करता तुम्ही ।
सर्वच तुम्ही, सर्वत्रची तुम्ही; म्हणूनच सर्वत्रची जाहला आनंद ।।’                समाप्त

कु. दीपाली मतकर (आताच्या पू. (कु.) दीपाली मतकर), सोलापूर (९.१०.२०२१)