समाजात प्रस्थापित होणारे अयोग्य आदर्श ?

  • व्यक्ती केवळ कर्तृत्ववान नव्हे, तर त्या जोडीला नीतीवानही असणे आवश्यक आहे !
  • गुंड आणि नीतीहीन लोकांचा आदर्श समोर ठेवणार्‍या पिढीचे अधःपतन निश्चित !

चंदनतस्करला ‘हिरो’ बनवणारा आणि अभिनेते अल्लू अर्जुन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात एका तस्कराचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करण्यात आले असून तो कशा प्रकारे पोलिसांना चकवा देत तस्करी केलेले चंदन बाजारपेठांमध्ये जाऊन विकतो, हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाला सर्वच स्तरांतील लोकांनी डोक्यावर घेतले असून विशेष करून तो तरुणांच्या पसंतीस अधिक उतरला आहे. ‘कुणाचा आदर्श घ्यावा ?’, ‘कुणाचे अनुकरण करायचे ?’ आणि ‘त्यातून नेमके काय साध्य करायचे ?’, याचे भान तरुणांना राहिले नसून ‘मै झुकेगा नही’ या चित्रपटातील वाक्याचे, तसेच ‘पुष्पा’ या चित्रपटातील अनेक गाण्यांप्रमाणेच कृती करण्यातच ते धन्यता मानत आहेत. यातील एका गाण्यात नायक ज्याप्रमाणे चालतो, त्याचप्रकारे तरुण आणि लहान मुलेही चालण्याची नक्कल करत आहेत. इतकेच काय, तर अलीकडेच भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस्.) असणार्‍या एका अधिकार्‍याने सामाजिक माध्यमात त्याच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे छायाचित्र ‘पोस्ट’ करून तो लहान मुलगा पुष्पा चित्रपटातील ‘हिरो’प्रमाणे ‘मै झुकेगा नही’ असे सांगत आहे, असे दाखवण्यात आले आहे.

खरेतर प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांना समाज आदर्श मानत असतो आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्यांच्याकडून समाजात योग्य गोष्टींचे आदर्शच उभे केले गेले पाहिजेत. त्याऐवजी त्यांच्याकडूच जर अशा प्रकारे चित्रपटातील गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्याची कृती होत असतील, तर समाजाला योग्य दिशा कोण आणि कशी दाखवणार ?

नीतीहीन व्यक्तीमत्त्वांची नक्कल घातक !

अलीकडेच ‘गंगूबाई काठियावाडी’ हा वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलेच्या जीवनातील सत्यघटनेवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात गंगूबाईची भूमिका साकारणार्‍या आलिया भट्ट ही अभिनेत्री तोंडात ‘बीडी’ धरून बोलत असलेल्या काही संवादांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. आलिया भट्ट हिच्याप्रमाणे हावभाव आणि तोंडात ‘बीडी’ धरून संवाद म्हणणार्‍या एका लहान मुलीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला. देहविक्रयाशी संबंधित असलेल्या एका महिलेचे एका लहान मुलीने अशा प्रकारे केलेले अनुकरण आणि त्याला मिळत असलेली प्रसिद्धी हे समाज वेगाने अधोगतीकडेच जात असल्याचे लक्षण आहे. असे करतांना त्या मुलीच्या आई-वडिलांना त्यात काही आक्षेपार्ह वाटत नाही, हे अधिक संतापजनक आहे.

ज्या लहान वयात झाशीची राणी, राणी चेन्नम्मा, राजमाता जिजाऊ यांच्यासारख्यांचे संस्कार मनावर होणे अपेक्षित आहे, त्या वयात जर मुलींवर ‘गंगूबाई काठियावाडी’तील अश्लीलतेकडे झुकणारे संस्कार झाले, तर तरुणपणी त्यांच्याकडून एक आदर्श स्त्री होण्याची अपेक्षा कधीतरी ठेवता येईल का ? चित्रपटांमुळे मुलांच्या मनावर होणारे सखोल परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. मध्यंतरी नवी देहली येथे ३ अल्पवयीन मुलांनी एका २४ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली. या मुलांची चौकशी केल्यावर त्यांनी ‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ यांसारखे चित्रपट अन् ‘वेब सीरिज’ यांमध्ये दाखवण्यात आलेल्या गुंडांच्या जीवनशैलीचा आमच्यावर प्रभाव आहे’, असे पोलिसांना सांगितले. ‘पुष्पा’सारख्या चित्रपटांमधून गुन्हेगारांचे उदात्तीकरण चालू असून आज चित्रपटातील हे खलनायक वास्तववादी जीवनात तरुणांचे आदर्श बनत आहेत. तरुण पिढीच्या होत असलेल्या अधःपतनाचे हे काही एकमेव उदाहरण नव्हे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे निधन झाले. जरी ते एक जगप्रसिद्ध फिरकी गोलंदाज असले, तरी महिलांना अश्लील संदेश पाठवणे, लाच घेणे, अमली पदार्थांचे सेवन, अनेक महिलांशी संबंध यांसह अनेक आरोप त्यांच्या नावावर होते. या कृत्यांमुळे वॉर्न यांना एक वर्ष खेळण्यावर बंदीही घालण्यात आली होती. त्यांचे निधन झाल्यावर भारतात अनेक तरुणांनी शोक व्यक्त केला, इतकेच काय तर अनेकांनी त्यांचे छायाचित्र ‘डीपी’ आणि ‘स्टेटस’ला ठेवले. काही ठिकाणी तर तरुणांनी गटाने एकत्र येऊन वॉर्न यांचे छायाचित्र ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

शेन वॉर्न आणखी एका सेक्स स्कँडलमध्ये

पाश्चात्त्य जगात चारित्र्य हे दुय्यम ठरवले जाते आणि तेथे विवाहबाह्य संबंधांना अयोग्यही ठरवले जात नाही; मात्र भारतात एकपत्नीव्रत असलेल्या श्रीरामाचे गुणगाण केले जाते, ज्या संस्कृतीत चारित्र्य हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरवला जातो. भारतीय संस्कृतीत गुणवत्ता आणि कर्तृत्व यांचा सन्मान केला जातोच; मात्र त्या व्यक्तीच्या अंगी नैतिकता, नम्रता आदी गुणही असण्याविषयी भारतीय संस्कृती आग्रही आहे. हे लक्षात घेता एक क्रिकेटपटू म्हणून वॉर्न यांचे कर्तृत्व कुणीही नाकारू शकत नाही. त्यांना श्रद्धांजली वहाणेही चुकीचे नाही; मात्र त्यात किती वहावत जायला हवे, हे तरुणांनी नक्कीच सुनिश्चित करायला हवे.

हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक !

ऐन तारुण्यात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्यासाठी हसतहसत फासावर जाणारे अनेक तरुण क्रांतीकारक, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर यांसारखे कित्येक आदर्श विभूती भारतीय संस्कृतीने आपल्याला दिल्या आहेत. धर्मासाठी एक मास असह्य वेदना झेलून अंतिमत: हिंदु धर्मासाठी प्राणत्याग करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे उदाहरण तर जगात अन्यत्र कुठेच नसेल ! मग या सगळ्यांचा आदर्श सोडून हिंदु समाज अयोग्य आदर्शांना कवटाळून त्यामागे का धावत आहे ? याच्या मुळाशी गेल्यास लहानपणापासून धर्मशिक्षण नसणे, घरात आई-वडिलांकडून योग्य संस्कार नसणे हेच म्हणावे लागेल ! त्यामुळे ही स्थिती जर पालटायची असेल तर शाळा-महाविद्यालयांत आणि सामान्य हिंदूंसाठीही धर्मशिक्षण देणे अत्यावश्यक आहे अन् हाच त्यावरील योग्य उपाय ठरेल !