सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक जलस्रोतांच्या तपासणीत २९ ठिकाणच्या पाण्याचे नमुने अयोग्य

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील  पिण्याच्या पाण्याच्या ५ सहस्र ९४१ सार्वजनिक स्रोतांची जैविक तपासणी केली असता, जिल्ह्यातील २९ ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे नमुने अयोग्य आढळले आहेत. यामध्ये कुडाळ तालुक्यातील १०, कणकवली तालुक्यातील १३  मालवण तालुक्यातील ६ ठिकाणांचा समावेश आहे. पाण्याचे अयोग्य नमुने आलेल्या ग्रामपंचायतींना त्या स्रोतांचे शुद्धीकरण करून पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत पाठवण्याविषयी सूचित करण्यात आले आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या एकूण ५ सहस्र ९४१ स्रोतांचे ३ सहस्र ७०५ महिलांच्या माध्यमातून पाण्याची तपासणी करण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रशासनाच्या जल जीवन मिशन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध अन् सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हे शासनाचे प्रमुख उदिष्ट आहे.