पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – मध्यप्रदेशमध्ये इंदूर, देवास, हरदा येथील काही लोकांनी नंदी दूध पित असल्याची छायाचित्रे, ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याने हळूहळू देशभरातील शिवमंदिरामध्ये नंदीला दूध पाजण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमधील काही शिवमंदिरांमध्ये नंदीला दूध पाजण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. चिखली येथील ताम्हाणे वस्तीतील तुळजाभवानी मंदिर येथील नंदीला दूध पाजण्यासाठी रात्री पुष्कळ गर्दी झाली होती. त्यात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. धुळे येथील मंदिरांमध्ये आणि विदर्भातील काही भागांतील मंदिरातही नंदीला दूध पाजण्यासाठी भाविकांची गर्दी होती. याविषयी वृत्तवाहिन्यांवरील चित्रीकरणात नंदीच्या मूर्तीच्या मुखासमोर भाविक चमच्यात दूध घेऊन पाजण्याचा प्रयत्न करत असतांना चमच्यातील दूध हळूहळू शोषले जात असल्याचे दिसत होते.
अंनिसकडून आणि वाहिनीवर मात्र ही केवळ अफवा असल्याचे सांगितले जात होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी मिलिंद देशमुख म्हणाले की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये काहीही तथ्य नाही. लोकांनी या घटनेमागील शास्त्रीय कारण समजून घ्यावे आणि अफवा आणखी पसरणार नाही, याची काळजी घ्यावी. (अंनिस या घटनेमागील शास्त्रीय कारण संशोधन करून सांगणार कि नेहमीप्रमाणे काहीही वक्तव्य करून वेळ मारून नेणार ? घटना प्रत्यक्ष दिसतांना तिला अफवा म्हणण्याचे धाडस केवळ हिंदूंच्याच विषयी अंनिस करत आहे. अशा घटनांविषयी साधना करणारे तज्ञ, संत आणि धर्मशास्त्रातील जाणकार यांचे मत घेणे आवश्यक आहे, ही साधी गोष्ट प्रसारमाध्यमांना समजत नाही, हे हिंदूंचे दुर्दैव ! – संपादक)