आपण कितीही श्रीमंत असलो, तरी प्रत्येकाने मेट्रोतून प्रवास करण्याची सवय लावून घ्यावी ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले उद्घाटन !

  • ६ मार्चपासून मेट्रो सर्वसामान्यांसाठी खुली

पुण्यातील मेट्रो

पुणे – मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन माझ्या हस्ते झाले होते आणि आता उद्घाटनही माझ्या हस्ते झाले. ‘मास ट्रान्सपोर्ट’ (मोठ्या प्रमाणात वाहतूक) ही काळाची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारचा मेट्रो प्रकल्पांवर भर आहे. महाराष्ट्रातही मेट्रो प्रकल्पांची निर्मिती आणि विस्तार होत आहे. आपण कितीही मोठे (श्रीमंत) असलो, तरी प्रत्येकाने मेट्रोतून प्रवासाची सवय लावून घ्यावी. जितका मेट्रोने प्रवास कराल, तितकेच शहराला साहाय्य होईल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ६ मार्च या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या २ शहरांतील पिंपरी ते फुगेवाडी अन् गरवारे स्थानक ते आनंदनगर या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर एम्.आय.टी. महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेच्या वेळी ते बोलत होते.

या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित होते.

१. पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन स्वागत केले. मोदी यांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसेसचेही लोकार्पण करण्यात आले.

२. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी स्वत: गरवारे मेट्रो स्थानकावरून तिकीट काढून गरवारे ते आनंदनगर स्थानकापर्यंतचा प्रवास शाळकरी, तसेच दिव्यांग (विकलांग) विद्यार्थ्यांसह केला. पुणे मेट्रोचा प्रवास करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले प्रवासी ठरले. तत्पूर्वी मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी मोदी यांनी मेट्रोच्या अधिकार्‍यांकडून संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली.

३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारक यांना नमन करून मराठीतून केला, तसेच स्व. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचीही आठवण काढली.

नव्या विकासकामांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पायाभूत सुविधांमध्ये भर ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

नव्या विकासकामांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. या वेळी अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर टीका केली.

विक्रमी वेळेत पुणे मेट्रोचे काम पूर्ण ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

पुण्यासाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आहे. महामेट्रोने विक्रमी वेळेत पुणे मेट्रोचे काम पूर्ण केले. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.

पंतप्रधानांच्या पुणे दौर्‍याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध, काळे कपडे आणि मास्क घालून आंदोलन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील ६ मार्च या दिवशीच्या दौर्‍याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विरोध करत ‘मोदी गो बॅक’ असे कापडी फलक लावले. येथील अलका चौकात काँग्रेसच्या वतीने, तर पुणे रेल्वेस्थानकासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मोदी यांचा निषेध करण्यासाठी काळे कपडे आणि मास्क घालून हे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता, तसेच पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार, त्या मार्गात कार्यकर्ते अडथळा आणणार नाहीत, याची पोलिसांनी दक्षता घेतली.