रशियावर घालण्यात आलेले निर्बंध युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहेत !  

पुतिन यांची पाश्‍चात्त्य देशांना चेतावणी !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

मॉस्को (रशिया) – पाश्‍चात्त्य देशांकडून त्यांच्या देशावर लादण्यात आलेले निर्बंध हे युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहेत, असे विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. ‘युक्रेनमध्ये आकाशमार्ग निषिद्ध क्षेत्र (‘नो-फ्लाय झोन’) स्थापित करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्याचे युरोप आणि जगाला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणीही पुतिन यांनी दिली आहे. नाटोने ‘नो-फ्लाय झोन’ची युक्रेनची विनंती नाकारली आहे; कारण ‘असे केल्यास ते रशियाला मोठे युद्ध करण्यास प्रवृत्त करण्यासारखे होईल’, अस मत त्यांनी नोंदवले आहे.

युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून पाश्‍चात्त्य देशांनी रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर कठोर निर्बंध घातले आहेत. आस्थापनांना रशियामध्ये व्यवसाय करण्यास मनाई केली आहे.

आम्हाला रशियन बनावटीची लढाऊ विमाने द्या ! – युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची पाश्‍चात्त्य देशांकडे मागणी

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

कीव (युक्रेन) – आम्हाला रशियन बनावटीची लढाऊ विमाने उपलब्ध करून द्या, अशी मागणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी पाश्‍चात्त्य देशांकडे केली आहे. ‘हवेत लढाई लढण्यासाठी विमाने न मिळाल्यास भूमीवर रक्तपात वाढेल,’ असे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.

रशिया तिसर्‍या अणूऊर्जा प्रकल्पाकडे मार्गक्रमण करत आहे ! – युक्रेन

रशियन सैन्याने आतापर्यंत २ युक्रेनियन अणूऊर्जा प्रकल्प स्वतःच्या नियंत्रणात  घेतले आहेत आणि ते तिसर्‍या प्रकल्पाच्या दिशेने पुढे जात आहेत, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी म्हटले आहे.

झेलेंस्की यांची जो बायडेन यांच्याशी चर्चा

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी सुरक्षा, आर्थिक पाठबळ आणि रशियाविरुद्ध निर्बंध चालू ठेवण्याविषयी चर्चा केली.

युक्रेनच्या झिटोमिरमध्ये मेट्रो स्टेशनजवळ क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण

युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेनुसार, झिटोमिरमधील कोरोस्टेन मेट्रो स्टेशनजवळ रशियाने क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले. यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघे घायाळ झाले आहेत.

रशियाने मनोरुग्णांसाठीचे रुग्णालय घेतले कह्यात !

रशियन सैन्याने युक्रेनच्या बोरोडांका शहरातील मनोरुग्णांसाठीचे रुग्णालय कह्यात घेतले आहे. त्या रुग्णालयात ६७० रुग्ण असल्याची माहिती आहे. प्रादेशिक गव्हर्नर ओलेक्सी म्हणाले, ‘‘या लोकांना कसे बाहेर काढायचे, त्यांना कसे साहाय्य करायचे हे आम्हाला समजत नाही. त्यांना पाणी आणि औषधे यांची सतत आवश्यकता असते. त्यांच्यापैकी बरेच जण वर्षानुवर्षे अंथरूणाला खिळून आहेत.’’