सोलापूर, ४ मार्च (वार्ता.) – विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या ‘विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लीकेशन ऑफ योगा अँड मॅनेजमेंट’ हा प्रकल्प सोलापूरचा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या या प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या ‘वयम्’ वास्तूचे उद्घाटन ४ मार्च या दिवशी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय बापट यांनी केले, तर माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
या वेळी व्यासपिठावर विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष ए. बालकृष्णन्, महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट, महाराष्ट्र प्रांत संचालक किरण कीर्तने आदी उपस्थित होते. प्रारंभी राज्यपालांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाचे काम केले आहे. स्वामी विवेकानंद यांचे चरित्र घराघरापर्यंत पोचवण्यासाठी विवेकानंद केंद्र महान कार्य करत आहे. पूर्वाेत्तर भारतात विधायक कामांसाठी मोठा विरोध होत असतांना, त्याला न जुमानता भारताला दूर होण्याच्या स्थितीपासून वाचवण्यात विवेकानंद केंद्राचा मोठा वाटा आहे.
देश आणि धर्म यांसाठी काम करणे हाच आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा उद्देश असायला हवा ! – ए. बालकृष्णन्, राष्ट्रीय अध्यक्ष, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी
विश्व टिकवायचे असल्यास सनातन धर्म टिकला पाहिजे. त्यासाठी भारताने विश्वगुरु बनणे आवश्यक आहे. देश आणि धर्म यांसाठी काम करणे हाच आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा उद्देश असायला हवा. ‘वयम्’ प्रकल्पाच्या माध्यमातून यासाठी मोठे कार्य भविष्यात उभे राहील.