देशहितासाठी भारताने प्रथम अणूआक्रमण करण्याचीही सिद्धता ठेवावी ! – भरत कार्नाड, संरक्षण आणि भूराजकीय तज्ञ

चीनविषयक भारताने ठेवायच्या भूमिकेवर परखड भाष्य !

भरत कार्नाड

मुंबई – भारताने आता ‘अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही’, हे धोरण पालटले पाहिजे, तसेच देशाहितासाठी आवश्यक असल्यास प्रथम अणूआक्रमण करण्याचीही सिद्धता ठेवली पाहिजे. ‘देशहित सर्वोच्च’ हेच धोरण असावे, असे मत संरक्षण आणि भूराजकीय तज्ञ भरत कार्नाड यांनी नुकतेच व्यक्त केले. माजी कॅबिनेट सचिव बी.जी. देशमुख यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘एशियाटिक सोसायटी’च्या वतीने ‘भारताचे भूराजकारण अधिक समर्थ करण्याचे मार्ग’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. कार्नाड हे नवी देहलीतील ‘नॅशनल सिक्युरिटीज् स्टडीज् सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ येथे मानद प्राध्यापक आहेत. माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भारतीय अणू कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना ‘अण्वस्त्रसज्ज देशांची साखळीच आशियात स्थैर्य कायम ठेवू शकते’ असा सल्ला दिल्याची आठवणही भरत कार्नाड यांनी या वेळी उपस्थितांना करून दिली.

कार्नाड ते पुढे म्हणाले की,

१. चीनच्या विस्तारवादाचे आव्हान आपल्यापुढे उभे ठाकले आहे. डोकलाम, लडाख आणि अरुणाचलप्रदेशच्या माध्यमातून भारतासमोर सतत संकटे उभी करणे, हेच चीनचे धोरण आहे. आपल्यासमोर गुडघे टेकणारा भारत चीनला हवा आहे. चीनच्या या विस्तारवादाला तोंड देण्यासाठी भारताने अमेरिकेच्या आधारे धोरण आखले आहे; पण अमेरिका कधी वैयक्तिक स्वार्थ सोडून कुणालाही साहाय्य करत नाही. युक्रेन हे त्याचे ताजे उदाहरण आहे.

२. चीन कधीच भारताला बरोबरीने आणि सन्मानाने वागवणार नाही, हे लक्षात घेऊन चीनच्या भूराजकीय आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताने धोरण आखण्याची आवश्यकता आहे. चीनने पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज करून भारतासमोर संकट उभे केले आहे. त्याच धर्तीवर भारतानेही तैवान, व्हिएतनाम, फिलिपाइन्स यांसारख्या देशांना अण्वस्त्रसज्ज होण्यासाठी साहाय्य करून चीनच्या अवतीभवती वेढा निर्माण केला, तरच चीनच्या विस्तारवादाला तोंड देता येईल. चीनच्या अवतीभवती अशा अण्वस्त्रसज्ज मित्रराष्ट्रांचा वेढा सिद्ध करून भारताने संरक्षण तळ सिद्ध केले, तरच स्वतःच्या आक्रमकतेला होणारा प्रतिकार आणि संभाव्य हानी यांची भीती चीनच्या मनात निर्माण होऊन त्याच्या विस्तारवादाला अन् अरेरावीला नियंत्रणात ठेवता येईल.

३. चीनच्या या विस्तारवादाचा त्रास केवळ भारतालाच नव्हे, तर दक्षिण आशियाई, दक्षिण कोरिया आणि जपानसारख्या उत्तर आशियाई देशांनाही होत आहे. चीनविरोधात भारताने स्वतःचे भूराजकीय स्थान, साधनसंपत्ती, तंत्रज्ञानातील बळ आणि अण्वस्त्रसज्जता यांचा वापर करायला हवा. दक्षिण कोरिया आणि जपान यांच्याशीही सहकार्य वाढवावे. इंडोनेशियासह शक्य त्या देशांत भूदल आणि नौदल यांचे तळ उभारावेत. पुढच्या काही वर्षांत अमेरिका आणि चीननंतर भारत ही जगातील तिसरी आर्थिक ताकद असेल, अशी चिन्हे आहेत.