कारागृहातील सुरक्षाव्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर !
पणजी, १ मार्च (वार्ता.) – कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात बंदीवान गजेंद्र सिंही उपाख्य छोटू याच्यावर बंदीवान आशिफ आणि इम्तियाज यांनी सुरीने प्राणघातक आक्रमण केले. १ मार्च या दिवशी सकाळी ७.३० वाजता ही घटना घडली. वैर असल्याने आणि वर्चस्वाच्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. या आक्रमणात छोटूच्या चेहरा आणि पोट यांवर सुरीचे वार झाले आहेत. कारागृहातील अधिकार्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षाव्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
बंदीवान गजेंद्र सिंह याच्यावर म्हापसा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्याला पुन्हा कारागृहात आणण्यात आले आहे. अतिरिक्त कारागृह महानिरीक्षक वासुदेव शेट्ये म्हणाले, ‘‘कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांमध्ये हाणामारी झाली आहे. यामध्ये कैदी गजेंद्र सिंह याला किरकोळ मार लागला आहे. या घटनेचा अहवाल कारागृह महानिरीक्षकांना देण्यात येणार आहे.’’ कळंगुट येथील सोझा लोबो रॅस्टॉरंटमध्ये तोडफोड केल्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजेंद्र सिंह याला न्यायालयीन कोठडी असल्याने त्याची रवानगी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.