कोल्हापूर, १ मार्च (वार्ता.) – अल्पसंख्यांकमंत्री नबाब मलिक यांनी मुंबई बाँबस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असणारी भूमी खरेदी केली. मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला असून त्यांच्यावर ‘ईडी’ आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी कारवाई केली. अशा नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ अख्खे मंत्रीमंडळ रस्त्यावर येते. याचा अर्थ महाविकास आघाडी आतंकवादी दाऊदचे समर्थन करते, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
१. देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाल्यावर तरी मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार हे नवाब मलिक यांचे त्यागपत्र घेतील, असे वाटले होते; मात्र ते सगळेच मलिक यांचे समर्थन करत आहेत.
२. जिथे सामान्य माणूस आंदेलन करू शकत नाही. त्या मंत्रालयाच्या आतील परिसरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन केले. त्यामुळे जोपर्यंत मलिक यांचे त्यागपत्र घेतले नाही, तोपर्यंत भाजप आंदोलन चालूच ठेवणार आहे. अधिवेशनात मलिक यांच्या त्यागपत्राची मागणी करून अधिवेशनही चालू देणार नाही.
३. सरकारी कर्मचार्यांवर गुन्हा नोंद झाल्यावर त्यांचे २४ घंट्यात निलंबन होते. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचेही त्यागपत्र घेण्यात आले, तर मंत्री नवाब मलिक यांना वेगळा न्याय का ?
४. ‘फोन टॅपिंग’ प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अन्वेषण करण्यास सरकारला कुणीही अडवलेले नाही. सरकार स्थापन होऊन २७ मास झाले, मग इतके मास का कारवाई केली नाही ?