संभाजीनगर – शहरापासून ७ किलोमीटर अंतरावरील वरूड काझी येथील श्री जुन्नेश्वर महादेव मंदिराचा १ कोटी ६१ लाख रुपये व्यय करून जीर्णोद्धार करण्यात येत आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी पहाटे ४ वाजता मंदिरात महादेवाला अभिषेक घालून ५ वाजता आरती करण्यात आली, तसेच यात्रा भरली होती. सायंकाळी कुस्त्यांच्या स्पर्धा झाल्या, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त कैलास दांडगे यांनी दिली.
डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य ठिकाणी श्री जुन्नेश्वर संस्थान आहे. भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण वनवासाला आले होते. त्या वेळी या ठिकाणी ५ दिवस थांबले होते. श्रीराम प्रतिदिन पूजापाठ करून एक पिंड सिद्ध करत होते. या ५ दिवसांच्या ५ पिंडी येथे आहेत, अशी आख्यायिका आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मराठवाड्यातून दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या ठिकाणी आलेल्या भाविकांसाठी गावकर्यांकडून फराळ आणि इतर व्यवस्था केली जाते.
लोकवर्गणीतून १ कोटी ६१ लाख जमा !
गावकर्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लोकवर्गणीतून १ कोटी ६१ लाख जमा केले असून मंदिराचा आराखडा सिद्ध केला. त्यानंतर वर्ष २०१९ पासून हेमाडपंती मंदिराचे बांधकाम चालू आहे. हे काम ‘तिडके टेम्पल कन्स्ट्रक्शन’ला दिले आहे. मंदिर उभारणीसाठी खास देगलूरहून काळा पाषाण दगड मागवला आहे. गाभारा ५ फूट खोल आणि १५ बाय १५ चा करणार असून ५१ फूट उंच रहाणार आहे. गाभार्याच्या लगत २५ बाय २० फुटांचा सभामंडप बांधणार आहेत. त्यासाठी राजस्थानातून कारागीर आणले आहेत.