निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्यास ‘आत्मनिर्भर भारता’चे स्वप्न साकार होईल ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई – निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस्.एन्.डी.टी.) महिला विद्यापिठाच्या ७१ व्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते.

भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, पाश्चात्य जगात लिंग समानतेची संकल्पना आहे; परंतु भारतात स्त्रीला मातृशक्ती आणि पराशक्ती म्हणून पुरुषांपेक्षा श्रेष्ठत्व दिले आहे. महिला विद्यापिठाच्या विद्यार्थिनींनी त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून देशसेवेचा संकल्प करून कार्य करावे. सुभाषचंद्र बोस यांनी आय.सी.एस्.चा त्याग करून देशासाठी ‘आजाद हिंद सेने’ची स्थापना केली. या महान विभूतींचे आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पलीकडे जाऊन समाज आणि देश यांसाठी कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, या विद्यापिठाच्या शताब्दी वर्षात शासनाने ७५ कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यांपैकी ३२ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल.

दीक्षांत समारंभामध्ये १४ सहस्र ५४८ विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आली.