यापुढे एकाही घुसखोराला महाराष्ट्रात राहू दिले जाणार नाही ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिर्डी – ‘व्होट जिहाद २’ म्हणून बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र मागत आहेत. नाशिकमधील अमरावती आणि मालेगाव तालुक्यात अशी जवळपास १०० प्रकरणे समोर आली आहेत. साधारणत: ५० वर्षांचे हे लोक अवैध कागदपत्रे मिळवत आहेत. यापुढे एकाही घुसखोराला महाराष्ट्रात राहू दिले जाणार नाही. आपण आता सिद्ध आणि एकजूट राहिले पाहिजे. ‘एक है तो सुरक्षित है’ या पंतप्रधानांच्या वचनाने आम्हाला मार्गदर्शन केले. मुंबई, ठाणे, नागपूरसह अनेक नागरी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. येत्या ३ ते ४ मासात या निवडणुका घेण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय अधिवेशात बोलत होते. या अधिवेशनासाठी राज्यातून सहस्रो भाजप कार्यकर्ते शिर्डी येथे आले आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘साईबाबा यांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला असून तो भाजपमध्येही अतिशय महत्त्वाचा आहे. यात ‘राष्ट्र प्रथम’ म्हणजे श्रद्धा आहे. ‘मै’ म्हणजे ‘मी’ म्हणजे ‘सबुरी’ आहे. ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले.’’ या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ‘‘पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत फार मोठे काम केले आहे. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून खासदार शरद पवार यांनी जे दगाफटक्याचे राजकारण चालू केले होते, ते जमीनीत गाडण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले आहे.’’