हिंदूंच्या मंदिरांनी प्रशासन आणि सरकार यांच्या आधीन राहिले पाहिजे का ? – मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाचा प्रश्‍न

मदुराई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने रंगराजन् नरसिंहन् यांच्याविरोधात मानहानीच्या संदर्भातील प्रविष्ट करण्यात आलेल्या २ याचिका फेटाळून लावल्या आहेत. रंगराजन् यांनी श्री रंगनाथ स्वामी मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात प्रश्‍न उपस्थित केले होते, तसेच राज्यातील सहस्रो मंदिरांच्या स्थितीविषयी आवाज उठवला होता. या वेळी न्यायाधीश जी.आर्. स्वामीनाथन् यांनी म्हटले की, भारतातील मंदिरे पुनरूज्जीवित करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंच्या मंदिरांनी प्रशासन आणि सरकार यांच्या आधीन राहिले पाहिजे का ?, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

रंगराजन् नरसिंहन् यांनी श्री रंगनाथ स्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाच्या काराभाराविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत सामाजिक माध्यमांद्वारे धर्मादाय विभागाचे आयुक्त आणि मंदिर विश्‍वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष यांचे अवैध कार्य उघड केले होते. हे आरोप संबंधितांनी फेटाळून लावत रंगराजन् यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला प्रविष्ट केला, तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. रंगराजन् यांच्यावर यापूर्वीच २ गुन्हे नोंदवण्यात आले होते. या वेळी न्यायालयाने ‘मंदिर न्याय आणि धर्मादाय विभाग यांचा कारभार उघड करण्यात आल्यामुळे भक्तांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले’, असे स्पष्ट केले.

धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या सरकारांनी मंदिरांप्रमाणे चर्च आणि मशिदी यांवरही नियंत्रण ठेवले पाहिजे !

यावर सुनावणी करतांना न्यायाधीश स्वामीनाथन् यांनी म्हटले की, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या सरकारांनी धार्मिक संस्थानांच्या संदर्भात समान व्यवहार केला पाहिजे. टी.आर्. रमेश यांच्यासारखे जाणकार आणि उत्तरदायी कार्यकर्त्याने म्हटल्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या सरकारांनी मंदिरांप्रमाणे चर्च आणि मशिदी यांवरही नियंत्रणे का ठेवू नये ?

उपेक्षित मंदिरांना त्यांचा गौरव पुन्हा मिळवून देण्याची आवश्यकता !

न्या. स्वामीनाथन् पुढे म्हणाले की,  आपल्या संस्कृतीमध्ये मंदिरांची भूमिका महत्त्वाची आहे; मात्र सध्याच्या स्थितीमध्ये त्यांच्या काही आवश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या मंदिरांच्या पोषणासाठी देण्यात आलेल्या भूमींवर वैयक्तिक स्वार्थासाठी नियंत्रण मिळवण्यात आले आहे. देशाच्या प्राचीन मूर्तींची चोरी करून त्यांची विदेशात तस्करी करण्यात आली आहे. मंदिरांच्या पुजार्‍यांना नगण्य वेतन दिले जाते. राज्यातील सहस्रो मंदिरे उपक्षेचे बळी ठरली आहेत. या मंदिरांमध्ये पूजाही होत नाही. या मंदिरांना पुन्हा एकदा त्यांचा गौरव मिळवून देण्याची आवश्यकता असून त्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे.