शिवजयंतीनिमित्त पुणे येथे झालेल्या कार्यक्रमांत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांचा राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्धार !

चिखली येथील व्याख्यानाला उपस्थित शिवप्रेमी

पुणे, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीनिमित्त येथील चिखली, मोशी, आंबेगाव पठार या भागांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोशी आणि आंबेगाव पठार येथील कार्यक्रमांमध्ये हिंदु जनजागृती समितीने व्याख्यानाच्या माध्यमातून सहभाग घेतला, तर चिखली येथील कार्यक्रमात समितीच्या कार्यकर्त्यांनी व्याख्यान, तसेच स्वरक्षण प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. व्याख्यान ऐकून अनेक शिवप्रेमी, राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करत या कार्यात सहभागी होण्याचा निर्धार केला.

चिखली येथील शंकेश्वर क्रिम्सन् हाऊसिंग सोसायटी येथे झालेल्या व्याख्यान आणि स्वरक्षण प्रशिक्षणातील प्रात्यक्षिकांचा २२५ हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. केतन पाटील यांनी ‘शिवचरित्राचा जागर करण्याची आवश्यकता !’ या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर हिंदू जनजागृती समितीच्या कु. चारुशीला चिंचकर, कु. गार्गी पाटील, कु. माऊली शिंदे, श्री. अक्षय फाटे, श्री. कौशिक पाटील या कार्यकर्त्यांनी वीरश्री निर्माण करणारी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. स्वरक्षणाची प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. या वेळी अनेकांनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गामध्ये सहभागी होण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांकडे नावनोंदणीही केली. सोसायटीच्या वतीने समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या आयोजनात धर्मप्रेमींचा पुढाकार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गामध्ये सहभागी होणारे धर्मप्रेमी सर्वश्री संतोष राक्षे, पियुष विभूते, राजेश पतंगे, जयेश पाटील, मयुर कासार, लक्ष्मीनारायण येमुल यांनी चिखली येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला. सोसायटीचे संचालक श्री. उज्ज्वल अक्कर आणि सचिव श्री. चितप्पा परशेट्टी यांनी व्याख्यानाचे मुख्य आयोजन केले होते. धर्मप्रेमी श्री. वैभव पावसकर आणि सौ. शिल्पा वराडे यांनी समन्वय करून समितीच्या कार्यकर्त्यांना पुष्कळ सहकार्य केले.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य अतिशय स्तुत्य ! – माजी महापौर राहुल जाधव, जाधववाडी

माजी महापौर राहुल जाधव

चिखली येथे झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येथील माजी महापौर राहुल जाधव उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य अतिशय स्तुत्य आहे. या कार्याला माझे कायम साहाय्य राहील.’’

आंबेगाव पठार येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

आंबेगाव पठार येथे मार्गदर्शन करतांना श्री. शशांक सोनवणे

आंबेगाव पठार येथील एस्.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, ज्ञान प्रसारक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज येथे संयुक्तपणे झालेल्या शिवजयंती कार्यक्रमात प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मशाल प्रज्वलित करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशांक सोनवणे यांनी ‘राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कसे संस्कार केले ? शिवरायांनी कुलस्वामिनीची उपासना कशी केली ? शिवरायांनी गुरूंचे आज्ञापालन कसे केले ? त्यांच्यामध्ये कोणते ईश्वरी गुण होते ? आणि ते गुण आपण आपल्या जीवनात कसे आचरणात आणले पाहिजे ?’, याविषयी विद्यार्थ्यांना अवगत केले. या व्याख्यानाला ५० विद्यार्थी आणि १० शिक्षक उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशांक सोनवणे आणि श्री. दीपक आगवणे यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक श्री. अरुण सोकांडे पाटील, सचिव सौ. मंगल सोकांडे, शाळेचे मुख्याध्यापक सौ. पल्लवी सोकांडे आणि अमर सोकांडे यांनी केले.

मोशी येथील साईकृपा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समितीचा सहभाग !

मोशी येथे मार्गदर्शन करतांना श्री. नीलेश जोशी

साईकृपा मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. या व्याख्यानात हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश जोशी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी श्री. नीलेश जोशी यांनी सांगितले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनून हिंदु धर्माची सेवा करणे म्हणजे खर्‍या अर्थाने शिवजयंती साजरी करणे होय.’ या व्याख्यानाला ४० हून अधिक शिवप्रेमी उपस्थित होते. मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सूर्यकांत बोरकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी भाजपचे नगरसेवक श्री. संतोष लांडगे यांच्या हस्ते श्री. नीलेश जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

विशेष

१. एस्.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि ज्ञान प्रसारक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज येथे शिवजयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने शाळेत येऊन विषय सादर करावा, असे कार्यक्रमाच्या आयोजकांनी स्वतःहून सांगितले, तसेच ‘पुढे होणार्‍या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही आपल्याला आमंत्रित करू आपण आवर्जून यावे’, असेही महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.
२. मोशी आणि चिखली येथील व्याख्यानाला महिला अन् लहान मुलांची लक्षणीय उपस्थिती होती. मोशी येथे व्याख्यानानंतर आयोजकांनी समितीच्या कार्याविषयीची माहिती जाणून घेतली.

चिखली येथे मार्गदर्शन करतांना श्री. केतन पाटील

३. चिखली येथे झालेल्या व्याख्यानाविषयी सोसायटीतील श्री. रनाराम चौधरी म्हणाले की, ‘अशा प्रकारचे कार्यक्रम होणे आवश्यक आहे. हिंदु एक झाले नाहीत, तर पुढच्या पिढीचे पतन होईल. या कार्यक्रमामुळे चांगले संस्कार होऊन हिंदूंचे संघटन होण्यास साहाय्य होते.’ या वेळी सौ. पूजा अक्कर यांनीही समितीच्या ‘स्वरक्षण प्रशिक्षण’ या उपक्रमाचे कौतुक केले.

स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवतांना समितीचे कार्यकर्ते