जगातील ३० सर्वांत सुंदर पर्यटनस्थळांमध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश

‘काँड नास्ट ट्रॅव्हलर’ या लंडन येथील प्रवासाविषयीच्या प्रसिद्ध पुस्तिकेत जागतिक पर्यटनस्थळांची सूची घोषित

सिंधुदुर्ग – ‘काँड नास्ट ट्रॅव्हलर’ या लंडन येथील प्रवासाविषयीच्या प्रसिद्ध पुस्तिकेत वर्ष २०२२ मध्ये भेट देण्यासाठी (पर्यटनासाठी) जगातील ३० सर्वांत सुंदर पर्यटनस्थळांची सूची घोषित करण्यात आली आहे. या सूचीमध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांसह भारतातील सिक्कीम, मेघालय, ओडिशा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळ आणि महाराष्ट्रातील एकमेव स्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश केला आहे. ‘जगातील सर्वांत सुंदर ३० पर्यटनस्थळांच्या सूचीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश असणे, ही अभिमानाची गोष्ट आहे’, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

‘काँड नास्ट ट्रॅव्हलर, इंडिया’कडून प्रतिवर्षी जगातील सुंदर पर्यटनस्थळांची सूची आणि त्यांची माहिती प्रसिद्ध केली जाते. जागतिक स्तरावरील पर्यटनास चालना देण्यासाठी त्यांच्याकडून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.

या वर्षीच्या सूचीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड होणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या पुस्तिकेत सिंधुदुर्गातील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा, समुद्रातील प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, ‘सुनामी आयलंड’ (सुनामी बेट) यांसारख्या पर्यटनस्थळांविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे, तसेच ‘स्कुबा डायव्हिंग’ची सोय, समुद्री जीवनदर्शनाची सोयही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.