उद्या माघ कृष्ण पक्ष नवमी म्हणजेच रामदासनवमी आहे. त्या निमित्ताने …
१०.२.२०२२ या दिवशी दासबोध जयंतीच्या निमित्ताने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेल्या ‘दासबोध’ या ग्रंथाचे माहात्म्य’ असा विषय घेतला. उद्या २५.२.२०२२ या दिवशी असलेल्या रामदासनवमीच्या निमित्ताने समर्थ रामदासस्वामी यांच्या पावन चरणांना स्मरून लेखरूपामध्ये त्या सूत्रांचे अवलोकन करूया.
१. समर्थांचे जीवनचरित्र
१ अ. त्या काळची सामाजिक स्थिती
‘त्या काळी बहामनी (आताचे कर्नाटक) राज्यातून निर्माण झालेल्या पाचही पातशाह्या आपापल्या प्रदेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार करत होत्या. उत्तरेत मोगल आणि दक्षिणेकडे पोर्तुगीज धुमाकूळ घालत होते. समाज आक्रमकांच्या भक्ष्यस्थानी पडत चालला होता. ही भयावह करणारी परिस्थिती कधी पालटेल, हे कळत नव्हते.
१ आ. धार्मिक वृत्तीच्या आई-वडिलांच्या पोटी जन्म
अशा स्थितीत मराठवाड्यातील जांब या गावी रहाणार्या सूर्याजीपंत ठोसर यांच्याकडे परंपरेने कुलकर्णीपद आले होते. त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्या श्रीराम आणि सूर्यनारायण यांची उपासना अखंडपणे चालू होती. असे सर्व संस्कार घेऊन समर्थ रामदासस्वामी यांनी सूर्याजीपंत आणि त्यांची पत्नी राणूबाई यांच्या पोटी वर्ष १६०८ च्या चैत्र शुक्ल पक्ष नवमीला, म्हणजे श्रीरामनवमीच्या दिवशी माध्यान्ह काळी जन्म घेतला. त्यांचे बालपणीचे नाव नारायण होते. नारायण रूपाने सुंदर, देहयष्टीने सुदृढ, चपळ, चौकस आणि कुशाग्र बुद्धीचा होता. नारायणाने बालपणीच सभोवतालची अत्याचारग्रस्त समाजाची स्थिती हेरली होती. त्याने तो व्यथित झाला होता.
१ इ. लहान वयातच विश्वाची चिंता करणारा नारायण !
नारायणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे द्रष्टेपण ! लहान असतांना नारायणाला चिंतित झालेले पाहून त्याच्या आईला वाटले, ‘वडिलांचे देहावसान झाले आहे, तर कुटुंबियांचे दायित्व घेण्याच्या विचाराने नारायण चिंतित दिसत आहे.’ आईने नारायणाला विचारले, ‘‘बाळ, कसली चिंता करतोस रे ?’’ त्यावर नारायण म्हणाला, ‘‘आई, चिंता करितो विश्वाची !’’ या उत्तरातून नारायणाने स्वत:ची मनोव्यथा व्यक्त करत आईला समाजाची स्थिती समजावून सांगितली. एवढ्याशा बालवयातच नारायणाने ओळखले होते, ‘भगवंताची कृपा प्राप्त केली, तरच सभोवतालच्या स्वकीय बांधवांना, या समाजाला मुक्त करता येणार आहे.’
१ ई. साधना करून रामाचा दास बनलेले रामदासस्वामी !
‘लौकिक बंधनात अडकायचे नाही’, हा नारायणाचा निश्चय दृढ झाला होता. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी नारायणाने लग्नमंडपातून पलायन केले आणि प्रभु रामरायाचे दर्शन घेण्यासाठी तो नाशिकला पोचला. रामरायाच्या दर्शनामुळे नारायणाला शांत वाटले. नंतर त्याने गोदावरी नदीच्या काठचा, त्याच परिसरातील टाकळी गावाचा निवांत आणि शांत परिसर पुढील साधनेसाठी निवडला. श्रीरामाच्या सेवेसाठी स्वतःची पूर्ण सिद्धता करून नारायण श्री हनुमंताप्रमाणे ‘रामदास’ झाला.
१ उ. ‘समर्थ’ हे रघुवीर श्रीरामाचे वैशिष्ट्य सांगण्यासाठी वापरलेले विशेषण लोकांनी रामदासस्वामींना लावणे
खरेतर समर्थांनी भगवान श्रीरामचंद्राला ‘समर्थ’ म्हटले आहे. स्वतःच्या बळावर सर्वकाही करू शकणारा तो ‘समर्थ !’ रामदासस्वामी नेहमी ‘जय जय रघुवीर समर्थ !’ असा प्रभु श्रीरामाचा जयघोष करत असत. ‘सर्वार्थांनी सामर्थ्यवान असलेल्या रघुवीर श्रीरामाचा जयजयकार असो !’ असा त्याचा अर्थ आहे. या विश्वात भगवंताविना समर्थ कुेणीच नाही. त्यामुळे रामदासस्वामींनी ‘समर्थ’ हे रघुवीर श्रीरामाचे वैशिष्ट्य सांगण्यासाठी वापरलेले विशेषण आहे. समर्थ असलेल्या रघुवीराचा जयजयकार रामदासस्वामींच्या मुखातून सदोदित ऐकतांना लोकांनी श्रीरामाचे हे विशेषण रामदासस्वामींनाच लावून दिले आणि पुढे ते सर्वत्र रूढ झाले.
२. समर्थांच्या अद्वितीय ग्रंथराज दासबोधाचे माहात्म्य
२ अ. प्रभु श्रीरामाच्या इच्छेनुसार समर्थांनी कथन केलेला आणि गुरु-शिष्य यांच्या आत्मसंवादातून उगम पावलेला उपदेश अन् बोध यांचे अमृतपान म्हणजे ‘ग्रंथराज दासबोध’ होय !
समर्थ हे अद्वितीय धर्माचार्य होते. त्यांनी वेळोवेळी विपुल लेखन केले आहे. त्यांनी केलेल्या अफाट ग्रंथरचनेत ‘दासबोध’ हा त्यांचा प्रमुख ग्रंथ मानला जातो. शके १५८१ मध्ये समर्थांनी त्यांचा शिष्योत्तम असलेल्या कल्याणस्वामी यांना उपदेशपर सांगितलेली सूत्रे त्यांनी लिहून घेतली. गुरु-शिष्य यांच्या आत्मसंवादातून उगम पावलेला उपदेश आणि बोध यांचे अमृतपान म्हणजे ‘ग्रंथराज दासबोध’ होय.
२ आ. ग्रंथाचा विषय ‘भगवद्भक्ती’ असणे
समर्थ रामदासस्वामींचा ‘दास्यभक्ती’ हा स्थायीभाव आहे. त्यामुळे दासबोध या ग्रंथाच्या आरंभीच समर्थांनी स्पष्टच म्हटले आहे, ‘येथे बोलिला विशद । भक्तिमार्ग ।।’ म्हणजे ‘या ग्रंथाचा विषय ‘भगवद्भक्ती’ हाच आहे.
२ इ. ‘दासबोध’ या शब्दाचा भावार्थ !
आता आपण ‘दासबोध’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. ‘दासबोध’ म्हणजे प्रभु रामचंद्राच्या दासाने, म्हणजे रामदासस्वामींनी शिष्यांना केलेला बोध (उपदेश). ‘प्रभु श्रीरामाची दास्यभावाने भक्ती करणार्या भक्तांना केलेला उपदेश’, असाही ‘दासबोध’ या शब्दाचा अर्थ आहे.
२ ई. सर्वांना मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ
‘जीवन कसे जगायचे ?’, हे शिकवणारा हा ग्रंथ सर्वांनाच मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ आहे आणि त्यात सांगितल्यानुसार जगल्याने खरोखरीच जीवन समृद्ध होते, असा अनुभव देणारा हा ग्रंथ आहे.
२ उ. ‘दासबोध’ हा ग्रंथ मनुष्याला संसारातील व्यवहारज्ञान आणि आध्यात्मिक जीवनातील दास्यभक्तीचे आत्मज्ञान सहज समजावून देणारा ‘ग्रंथराज’ आहे.
२ ऊ. ‘उत्कट भक्तीने परमार्थ कसा करावा ?’, याचा मार्गदर्शक !
‘भक्तीमार्ग कसा ओळखावा आणि कशा प्रकारे तो अंतःकरणात रुजवावा ?’, तसेच ‘उत्कट भक्तीने परमार्थ कसा करावा ?’, याचे समर्थांनी अतिशय बोधप्रद अन् सुंदर विवेचन आणि मार्गदर्शन यात केले आहे.
२ ए. ‘दक्षतेने प्रपंच नेटका कसा करावा ?’, हेही समर्थांनी सांगितले आहे.
२ ऐ. महर्षि वेदव्यासांप्रमाणे विविध विषयांचा सखोल आणि अभ्यासपूर्ण उल्लेख असणे
या ग्रंथात विविध विषयांचा सखोल आणि अभ्यासपूर्ण उल्लेख केलेला आहे. ‘समर्थांनी ‘दासबोध’ या ग्रंथाच्या माध्यमातून जितक्या विविध विषयांवर लेखन केले आहे, तितक्या विषयांवर महर्षि वेदव्यासांविना अन्य कुणीही लिहिलेले नाही’, असे जाणकारांचे मत आहे.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (११.२.२०२२)