सोलापूर, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील सर्व नद्यांवर मोठ्या क्षमतेचे ‘बॅरेजेस’ बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर प्रत्येकी १२ ‘टी.एम्.सी.’ पाणी साठवण क्षमता असलेले ९ बॅरेजेस बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सोलापूर जिल्हा जलसंपदा आढावा बैठकीत ते बोलत होते.
या वेळी जयंत पाटील म्हणाले, ‘‘सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी वाहून पुढे जाते. नंतर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पाणी नियोजन ठेवण्यासाठी मोठे बॅरेजेस निर्माण करण्याचे प्रस्तावित केले आहे. पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर ९ बॅरेजेस निर्माण केले जाणार आहेत. प्रत्येक ‘बॅरेजेस’ची पाणी साठवण क्षमता ही अनुमाने १२ ‘टी.एम्.सी.’ इतकी असणार आहे. त्यामुळे त्याचा लाभ या भागांतील शेतकर्यांना होणार आहे. शेतभूमी सिंचनाखाली आल्याने या भागांतील शेतकर्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे.’’
बाह्य नियुक्तीद्वारे १४ सहस्र अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे भरणार !
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग, तसेच धरणाच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केला. यावर पाटील म्हणाले, ‘‘जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आऊटसोर्सिंगद्वारे पुढील एक-दोन मासांत १४ सहस्र अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.’’