कुतुबमिनार परिसरातील मशीद आणि मंदिर यांच्या वादाविषयी देहलीतील न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

कुतुबमिनार परिसरातील मशीद

नवी देहली – कुतुबमिनार परिसरातील २७ हिंदु आणि जैन मंदिरांना पाडून तेथे बनवण्यात आलेल्या ‘कुव्वत-उल्-इस्लाम’ या मशिदीच्या विरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर येथील साकेत जिल्हा न्यायालयाने केंद्र सरकारचे संस्कृती मंत्रालय अन् पुरातत्व खात्याचे  देहली क्षेत्राचे महासंचालक यांना नोटीस पाठवून यावर उत्तर मागितले आहे. ही याचिका भगवान विष्णु आणि जैन देवता यांच्या वतीने प्रविष्ट करण्यात आली आहे.

न्यायालयात सुनावणीच्या वेळी भगवान विष्णु यांच्या वतीने अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी युक्तीवाद केला. त्यांनी म्हटले की, या मंदिराविषयी कोणताही वाद नव्हता. त्यांना पाडण्यात आले होते. त्यामुळे हे सिद्ध करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. गेल्या ८०० वर्षांपासून आम्ही पीडित आहोत. आता पूजा करण्याचा अधिकार मागत आहोत, जो आमचा मूळ अधिकार आहे. पुरातत्व खाते कायदा १९५८ च्या कलम १८ नुसार संरक्षित स्मारकांमध्येही पूजा करण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो.