छत्रपती शिवरायांनी घालून दिलेली युद्धनीती विसरल्यामुळेच पानिपत युद्धात हार पत्करावी लागली ! – संजय सोनवणी, इतिहास अभ्यासक

शिरूर (जिल्हा पुणे) – छत्रपती शिवरायांनी घालून दिलेली युद्धनीती विसरल्यामुळे आणि त्यांची सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक तत्त्वप्रणाली नजरेआड केल्यामुळे पानिपत युद्धात आपल्याला हार पत्करावी लागली, असे मत इतिहासाचे अभ्यासक श्री. संजय सोनवणी यांनी व्यक्त केले. शिवजयंतीनिमित्त येथील ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती’ने आयोजित केलेल्या रौप्यमहोत्सवी स्व. धनराज नहार स्मृती व्याख्यानमालेत ‘छत्रपती शिवाजी महाराज ते पानिपत’ या विषयावर ते बोलत होते. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती’चे संघटक आणि नगरसेवक मंगेश खांडरे यांनी स्वागत केले, तर ‘मावळाई प्रकाशन’चे डॉ. सुभाष गवारी यांनी सोनवणी यांचा परिचय करून दिला.

श्री. संजय सोनवणी पुढे म्हणाले की, कोणतेही युद्ध धार्मिक नसते, तर ते अधिकांश सत्ता आणि अर्थकारण यांभोवती केंद्रित झालेले असते. पानिपतचे युद्ध अचानक घडलेले नाही. काही लोकांचा अट्टहास आणि शहाणपणाचे बोल न ऐकल्यामुळे आपल्या फौजांना मोठे नुकसान सोसावे लागले. आताही या युद्धाची धर्मांध मांडणी केली जाते. त्यातून समाजात द्वेष पसरतो; मात्र त्या काळातील स्थिती, समजुती निराळ्या होत्या. त्यांचा कार्यकारणभाव सद्यःस्थितीशी जोडून माथी भडकावणे योग्य नाही. गतकाळातील काल्पनिकता पुढे करून सध्या युवावर्गाचा भविष्यकाळ बिघडवला जात आहे.

श्री. राजेंद्र मोरे यांनी व्याख्यानानंतर आभार व्यक्त केले.