कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार ! – आदित्य ठाकरे, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री

करवीरवासीयांच्या वतीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा चांदीची तलवार आणि श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिमा देऊन सत्कार करतांना राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यास नैसर्गिक देणगी लाभली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक समृद्ध ठिकाणे असून, सह्याद्री डोंगररांगा, नद्या, अभयारण्य, ऐतिहासिक तलाव, धरणे येथील नैसर्गिक संपन्नतेचे दर्शन घडवतात. या नैसर्गिक ठिकाणांसह श्री महालक्ष्मी मंदिर, महत्त्वाची धार्मिक स्थळे, ऐतिहासिक गडदुर्ग, पुरातन वास्तू या कोल्हापूरचे महत्त्व अधिकच अधोरेखित करतात. पर्यटन वृद्धीतून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केले.

जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी आदित्य ठाकरे यांच्या वतीने पर्यटन विभागाकडून संमत निधीविषयी करवीरवासियांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी आदित्य ठाकरे यांचा चांदीची तलवार, श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती, पुष्पहार आणि शाल देऊन नागरी सत्कार केला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी खासदार श्री. धैर्यशील माने, आमदार श्री. प्रकाश आबीटकर, भगिनी मंच अध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, सौ. दिशा ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते श्री. ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते श्री. पुष्कराज क्षीरसागर, माजी उपमहापौर श्री. रविकिरण इंगवले यांसह अन्य उपस्थित होते.