शिवजयंतीला चिखली (बुलढाणा) येथे विनाअनुमती मोटारसायकलची फेरी काढली !
बुलढाणा – कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील भाजपच्या आमदार सौ. श्वेता महाले यांच्यासह ३५ जणांवर विविध कलमाअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी, म्हणजेच १९ फेब्रुवारी या दिवशी जिल्ह्यातील चिखली या गावात मोटारसायकलींची फेरी काढण्यात आली होती; मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे या फेरीला अनुमती देण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.
फेरीत सहभागी असलेल्यांपैकी कुणीही मास्क लावला नाही किंवा सामाजिक अंतराचे नियम पाळले नाहीत. आमदाराव्यतिरिक्त ज्या लोकांवर गुन्हा नोंद झाला आहे, ते शिवजयंती समितीशी संबंधित होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग आहे. याविषयी आमदार सौ. श्वेता महाले म्हणाल्या, ‘‘आमची फेरी शांततेत पार पडली. आम्ही जिजामातेच्या मुली आहोत. शिवजयंती साजरी केल्याविषयी आमच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असेल, तर आम्हाला त्याचा अभिमान असून आम्ही असे पुन: पुन्हा करत राहू.’’