कोकण विभागासाठी विनामूल्य पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

नवी मुंबई – पर्यटन क्षेत्रात तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय, कोकण विभागाच्या वतीने २१ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत विनामूल्य पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

स्थानिक प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी ‘टूर गाईड’ची व्यवस्था करणे आणि या माध्यमातून युवकांना रोजगार मिळवून देणे या दुहेरी हेतूने कोकण विभागातील ६ पर्यटनस्थळी पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

५ दिवसांचे हे प्रशिक्षण असणार आहे. या प्रशिक्षणात स्थानिक तरुणांना प्राधान्य मिळणार आहे. यामध्ये स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम आणि सुरक्षा उपाययोजना पाळून पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा, तसेच पर्यटकांशी संवाद साधतांना आपल्याकडील माहिती गोष्टीरूपाने कशी मांडावी, याविषयी सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.