इराण येथून भारतात विक्रीसाठी आणलेले ५० कोटी रुपये किमतीचे ‘हेरॉईन’ जप्त

उत्तर गोवा येथून दोन तस्कर केंद्रीय गुप्तचर संचालनालयाच्या गोवा शाखेच्या कह्यात

प्रतिकात्मक चित्र

पणजी, २० फेब्रुवारी (वार्ता.) – मीठ आयात करण्याच्या बहाण्याने इराण येथून भारतात विक्रीसाठी आणलेले ५० कोटी रुपये किमतीचे ‘हेरॉईन’ हे अमली पदार्थ केंद्रीय गुप्तचर संचालनालयाच्या (डी.आर्.आय.) गोवा शाखेला कह्यात घेण्यात यश आले. या शाखेच्या अधिकार्‍यांनी संशयित तस्कर अब्दुल जहीर नासीर (मूळ अफगाणचा आणि सध्या रहाणारा जंगपुरा, देहली) आणि नितीश सुमनप्रसाद कुमार (रहाणारा लजपतनगर, देहली) उत्तर गोव्यातील एका नामांकित ‘नाईट क्लब’मध्ये अमली पदार्थाचा व्यवहार करतांना छापा टाकून कह्यात घेतले.

प्राप्त माहितीनुसार संशयित नितीश कुमार याचे एक आस्थापन आहे. या आस्थापनाने इराण येथून मिठाचे ६ ‘कंटेनर’ आयात केले होते. ८ दिवसांपूर्वी हे ‘कंटेनर’ भारतात पोचले होते. हे सर्व ‘कंटेनर’ नवीन देहली येथे तुघलकाबाद शहरातील ‘आंतरराष्ट्रीय कंटेनर डेपो’मध्ये उतरवण्यात आले होते. १७ फेब्रुवारी या दिवशी केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या देहली शाखेने या कंटेनरची तपासणी केली असता त्यांना एका कंटेनरमध्ये ३४.७ किलो ‘हेरॉईन’ सापडले, तर इतर ५ ‘कंटेनर’मध्ये मीठ होते. त्याच वेळी ‘डी.आर्.आय.’ने ‘हेरॉईन’ असलेला ‘कंटेनर’ कह्यात घेऊन तपासाची सूत्रे गतीमान केली. यानंतर दोन्ही संशयितांना १७ फेब्रवारीच्या रात्री गोव्यातील ‘नाईट क्लब’मध्ये सापळा रचून कह्यात घेण्यात आले. संशयितांच्या विरोधात ‘अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५’च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यत आला आहे.