मुंबई – आयुर्वेद आणि युनानी डॉक्टर हे मान्यताप्राप्त आहेत. त्यामुळे त्यांचा ‘बोगस’ अथवा ‘भोंदू’ म्हणून उल्लेख केल्यास नोंदणीकृत व्यावसायिक कायद्याचा भंग होईल, असे परिपत्रक आयुष मंत्रालयाने काढले आहे. त्यामुळे यापुढे आयुर्वेद आणि युनानी डॉक्टर यांना ‘बोगस’ अथवा ‘भोंदू’ संबोधणार्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी सरकारी यंत्रणांमध्ये केवळ ‘एम्.बी.बी.एस्.’ डॉक्टरांना महत्त्व दिले गेले. त्यामुळे सरकारी मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊनही आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांना सरकारी विभागात स्थान मिळाले नाही. उलट ‘ॲलोपॅथी’च्या डॉक्टरांकडून आयुर्वेदाच्या डॉक्टरांना ‘भोंदू’ अथवा ‘बोगस’ म्हणून हिणवले गेले. याविषयी आयुर्वेद आणि युनानी डॉक्टर यांच्या काही संघटनांनी आयुष मंत्रालयाकडे तक्रार केली होती. त्यामुळे हा भेदभाव संपवण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून हे परिपत्रक काढण्यात आले आहे. यापुढे प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, सरकारी परिपत्रके, पोलिसांकडील तक्रारपुस्तिका आदी ठिकाणी आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांचा ‘भोंदू’ किंवा ‘बोगस’ असा उल्लेख करता येणार नाही.