समाजसेविका सिंधुताईंची ‘रोटी डे’ ही लोकचळवळ व्हावी या उद्देशाने कर्जत येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ ची कुप्रथा नाकारून ‘रोटी डे’ साजरा !

स्वैराचाराचे समर्थन करणार्‍या ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या विकृतीला नाकारणार्‍या कर्जतमधील विद्यार्थ्यांची अभिनंदनीय कृती ! या विद्यार्थ्यांचा आदर्श सर्वांनी घेऊन पश्चात्त्यांच्या प्रथा मोडून काढणे आवश्यक आहे. – संपादक

कर्जत – समाजसेविका सिंधुताई सपकाळ या अनाथांच्या माय होत्या. त्यांची आठवण म्हणून सिंधुताई यांच्या संकल्पनेतील ‘रोटी डे’ ही लोकचळवळ व्हावी; म्हणून येथील दादा पाटील महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी कर्जत येथील ‘स्नेह प्रेम’ या बालगृहामध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ ऐवजी ‘रोटी डे’ साजरा केला. ही अभिनव संकल्पना विद्यार्थी प्रतिनिधी सोनाली शिंदे पाटील आणि प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी राबवली.

या वेळी प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, ‘स्नेह प्रेम’ची प्रमुख फारूख बेग यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी सर्व उपस्थितांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.

या वेळी बोलतांना डॉ. अजित थोरबोले म्हणाले की, आज तरुणाई सर्वत्र ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करत असतांना कर्जतमध्ये मात्र सोनाली पाटील यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला आहे. याचे कौतुक करावे तेवढे अल्पच आहे. समाजामध्ये अशा पद्धतीचा आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

या वेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, महाविद्यालयीन शिक्षण घेतांना आज अनेक विद्यार्थी ‘पॉकेटमनी’ इतरत्र खर्च करतात; मात्र येथील विद्यार्थ्यांनी एक आदर्श पायंडा निर्माण केला आहे. या ठिकाणी दीनदुबळे, पीडित, शोषित यांचे अश्रू पुसण्याचे काम विद्यार्थ्यांनी या वयात केले आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.