सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्राला संत आणि वारकरी यांची मोठी परंपरा आहे. संतांचे विविध ग्रंथ मानवजातीला पावलोपावली दिशा देण्याचे कार्य करतात. समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेले ग्रंथ, ग्रंथराज दासबोध, तसेच अनेक साहित्य अखिल मानवजातीसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
श्रीक्षेत्र सज्जनगड येथील समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुकांचा प्रचार दौरा चालू आहे. तो पुणे येथे आला असता समर्थ वंशज अभिरामस्वामी, संस्थानच्या विश्वस्त डॉ. जोत्स्नाताई कोल्हटकर, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि समर्थभक्त मीनल राजकारणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘‘श्रीक्षेत्र सज्जनगड येथील समर्थ रामदासस्वामी यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मी उत्सुक आहे.’’
या वेळी राज्यपाल कोश्यारी यांनी श्रीक्षेत्र सज्जनगड येथील विकासकामांविषयी माहिती घेतली, तसेच समर्थ रामदासस्वामी यांचे कार्य, त्यांनी युवकांना दिलेली बलोपासनेची शिकवण, समर्थांनी भारतभर केलेली मठांची स्थापना आदींविषयी अभिरामस्वामी यांच्याकडून माहिती घेतली. अभिरामस्वामी यांनी राज्यपाल कोश्यारी यांना सज्जनगडावर येण्याची विनंती केली. त्यांनी ती विनाविलंब आनंदाने स्वीकारली.