राज्यात केवळ दिनांकानुसारच शिवजयंती साजरी व्हावी यासाठी शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार !

डावीकडून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि विधान परिषदेचे सदस्य अंबादास दानवे

संभाजीनगर – राज्यात अनेक वर्षांपासून १९ फेब्रुवारी या दिवशी दिनांकानुसार आणि दुसर्‍यांदा तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा साजरा होतो. २ वेळा शिवजयंती साजरी करण्याविषयी अनेक पक्ष आणि संघटना यांची मतमतांतरे आहेत. शिवसेना आतापर्यंत तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावर ठाम आहे; मात्र आता येथील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि विधान परिषदेचे सदस्य अंबादास दानवे हे २ ऐवजी १९ फेब्रुवारी या दिवशी म्हणजे दिनांकानुसारच शिवजयंती साजरी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहेत.

याविषयी आमदार संजय शिरसाट म्हणाले की, प्रत्येकवेळी काही पक्ष आणि शिवप्रेमी संघटना यांची शिवजयंती एकाच दिवशी साजरी करावी जेणे करून मोठ्या प्रमाणात जल्लोष करता येतो, अशी मागणी होती. त्यामुळे सरकारने कोणताही १ दिवस निश्चित करायला हवा.
अंबादास दानवे म्हणाले की, पूर्वीच्या काळी तिथीनुसार जयंती साजरी होत होती; मात्र आता दिनांकानुसार होणार्‍या शिवजयंतीमध्ये मोठा उत्साह पहायला मिळतो. यामुळे वेगवेगळ्या दिनांकाला शिवजयंती साजरी का केली जाते ?