२ वर्षांनंतर वारी भरल्यामुळे भाविकांत उत्साहाचे वातावरण
पंढरपूर, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – माघ शुद्ध जया एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी, तर रुक्मिणी मातेची पूजा प्रांताधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. माघ एकादशी निमित्त श्रीविठ्ठल-रक्मिणी यांच्या दर्शनासाठी ३ लाख भाविक पंढरपूर येथे आले होते.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि मंदिर समिती यांच्या वतीने वारकरी अन् भाविक यांच्यासाठी आवश्यक उपाययोजना, तसेच सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. एकादशी निमित्त दुपारपर्यंत दर्शन रांग पत्राशेडच्या पुढे पोचली होती. दर्शन रांगेतून श्रीविठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी ६ ते ७ घंटे कालावधी लागत होता. चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, ६५ एकर परिसर भाविक यांसह टाळ मृदूंगाच्या जयघोषाने पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली. २ वर्षांनंतर वारी भरल्यामुळे पंढरपूर शहरातील नागरिक आणि भाविक यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.