अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांवर अमानुष अत्याचार ! – नवनीत राणा, खासदार

अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांना भेटण्यास पालिका आयुक्तांचा नकार !

अमरावती – काही दिवसांपूर्वी महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी कारण नसतांना आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात आमदार रवी राणा यांचे नाव घ्यावे, यासाठी राजापेठ पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांवर अमानुष अत्याचार केला जात आहे, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केला.

महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणात एकूण ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खासदार नवनीत राणा राजापेठ पोलीस ठाण्यात पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करण्यासाठी पोचल्या. त्यांनी पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांची भेट घेऊन १ घंटा चर्चा केली.

महापालिका आयुक्तांनी खासदार राणा यांची भेट नाकारली !

महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोचलेल्या खासदार नवनीत राणा यांना आयुक्तांनी भेट नाकारली. बराच वेळ त्यांनी आयुक्तांच्या निवासस्थानासमोरील प्रवेशद्वारासमोर भेटीसाठी वाट पाहिली; मात्र आयुक्त भेटण्यास आले नाहीत. अखेर खासदार राणा राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांची भेट घेण्यासाठी पोचल्या.

मानवाधिकार आयोगाकडे करणार तक्रार !

खासदार नवनीत राणा म्हणाल्या, ‘‘पोलीस कोठडीत असणार्‍या आमच्या कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण केली जात आहे. प्रकरणाशी कुठलाही संबंध नसणार्‍या आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळजोरीने या प्रकरणात अडकवले आहे. आता अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांवर शाई फेकण्याच्या प्रकरणात आमदार रवी राणा यांचा हात असल्याचे मान्य करावे, यासाठी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि चप्पल यांनी मारहाण केली जात आहे. पोलिसांचे हे वर्तन अयोग्य असून कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात मानवाधिकार आयोग आणि लोकपाल यांच्याकडे तक्रार करणार आहे.’’