विभागीय वाहतूक अधिकारी सुरेश लोणकर यांची माहिती
सोलापूर – कोरोना संसर्गाविषयीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर श्री विठ्ठलाची माघ वारी १२ फेब्रुवारी या दिवशी पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे होत आहे. त्यानिमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर विभागांतील सोलापूर, कुर्डूवाडी, बार्शी, मंगळवेढा, सांगोला या ५ आगारांतून बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी सुरेश लोणकर यांनी दिली.
आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ या प्रमुख ४ वारींच्या निमित्ताने प्रतिवर्षी लाखो भाविक श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येतात; मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे १७ एप्रिल २०२० पासून श्री विठ्ठलाची एकही वारी भाविकांच्या उपस्थितीत होऊ शकली नाही. कोरोनाच्या संसर्गामुळे आषाढी वारीच्या निमित्ताने मानाच्या पालख्या परिवहन महामंडळाच्या साहाय्याने बसमधून पंढरपूर येथे आणण्यात आल्या होत्या. आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या न्यून होत आहे.