ज्यांच्याकडे राज्याच्या २ विभागांचे दायित्व आहे, असे मंत्रीच जर माहिती लपवत असतील, तर अशांकडून पारदर्शक कारभाराची काय अपेक्षा करणार ? – संपादक
अमरावती – निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याच्या प्रकरणी राज्याचे महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने २ मास कारावास आणि २५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत.
१. वर्ष २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यात मुंबईतील त्यांच्या सदनिकेच्या माहितीचा उल्लेख नव्हता. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी वर्ष २०१७ मध्ये तक्रार प्रविष्ट केली होती. (वर्ष २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत चुकीची माहिती दिल्याच्या प्रकरणी ७ वर्षांनंतर गुन्हा सिद्ध होतो, तेही कुणीतरी तक्रार प्रविष्ट केल्यावर, हे दुर्दैवी ! याचप्रकारे गुन्हा केल्यानंतरही सध्याच्या व्यवस्थेत अनेक वर्षे गुन्हाच सिद्ध होत नसल्याने अनेक गंभीर गुन्हे नोंद असलेले गुन्हेगार निवडून येतात आणि मंत्रीही होतात ! गेल्या ७३ वर्षांत आपण लोकशाही प्रगल्भ होत आहे असे म्हणतो, तीच हिच का ? गुन्हा जर सिद्ध झाला आहेच, तर बच्चू कडू यांनी आमदारकीच्या २ कालखंडांमध्ये ज्या सुविधा उपभोगल्या त्यावर काही कारवाई होणार का ? – संपादक)
२. त्यानंतर या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी चालू होती. बच्चू कडू यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ ‘अ’ अन्वये गुन्हा सिद्ध झाला आहे.