‘व्हाईट ड्वार्फ’ तार्‍याभोवती फिरणार्‍या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता !

 लंडन (इंग्लंड) – वैज्ञानिकांकडून एका ‘व्हाईट ड्वार्फ’ तार्‍याभोवती फिरणार्‍या ग्रहावर जीवसृष्टी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा ग्रह पृथ्वीहून ११७ प्रकाश वर्षे दूर आहे. ‘व्हाईट ड्वार्फ’ तार्‍याच्या जवळ पुष्कळ उष्ण तापमान असते, तर दूर पुष्कळ अल्प तापमान असते; परंतु विशिष्ट अंतरावर जगण्यासाठी आवश्यक तापमान असल्याचे खगोल शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. याला ‘गोल्डीलॉक्स झोन’ अस म्हटले जाते. या क्षेत्रामध्ये एखादा ग्रह फिरत असेल, तर त्यावर जीवसृष्टी असू शकते; कारण या क्षेत्रात मध्यम तापमान असल्याने या ग्रहावर पाणी असण्याची शक्यता असते. या संशोधनावर शिक्कामोर्तब झाल्यास सदर ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे, असे मत ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’चे प्रा. जे फरिही यांच्या नेतृत्वाखालील खगोल शास्त्रज्ञांच्या गटाने व्यक्त केले आहे. ‘रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’ या खगोलशास्त्राच्या जागतिक संघटनेच्या मासिक सूचनापत्रामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

१. हा ग्रह पृथ्वी आणि सूर्य यांच्यात असलेल्या अंतरापेक्षा त्याच्या सूर्याच्या, म्हणजे ‘व्हाईट ड्वार्फ’ तार्‍याच्या ६० पटींनी अधिक जवळ आहे.

२. एका वर्षात प्रकाश जेवढा प्रवास करेल, त्या अंतराला ‘एक प्रकाश वर्ष’ संबोधले जाते. प्रकाशाची गती ही सेकंदाला साधारण ३ लाख किलोमीटर एवढी अफाट आहे. ब्रह्मांडातील अंतर मोजण्यासाठी किलोमीटर, मैल अशा अंतराच्या छोट्या एककांचा वापर न करता प्रकाश वर्षांचा उपयोग केला जातो. पृथ्वी आणि सूर्य यांच्यात ८ प्रकाश मिनिटे एवढे अंतर आहे.

३. प्रा. फरिही यांनी सांगितले की, सदर ग्रह हा ‘व्हाईट ड्वार्फ’पासून एवढ्या योग्य अंतरावर फिरत आहे की, तेथे जीवसृष्टी असण्याची पुष्कळ शक्यता आहे. हे आम्हा सर्वांसाठी आश्‍चर्यकारक असून तेथे जीवसृष्टी असल्याचे सिद्ध झाले, तर यावरून अशा प्रकारच्या अन्य ग्रहांवरही जीवसृष्टी असू शकेल. यामुळे या संशोधनाला पुष्कळ महत्त्व प्राप्त झाले आहे, असे बीबीसी वृत्तवाहिनीने सांगितले.

(टीप: ‘व्हाईट ड्वाफ’ – तार्‍यांचे आण्विक इंधन संपल्यानंतर त्यांच्या बाहेरील कक्षेतील ऊर्जा नष्ट होत जाते. ते आकारामध्ये सूर्यापेक्षा लहान आणि घनफळात पृथ्वीपेक्षा थोडे मोठे असतात. अशा तार्‍यांना ‘व्हाईट ड्वार्फ’ म्हटले जाते.)