अमरावती येथे महापालिका आयुक्तांवर महिलांनी केली शाईफेक !

अमरावती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचे प्रकरण

आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर ३ महिलांनी अचानक शाई फेकली

अमरावती – ९ फेब्रुवारी या दिवशी शहरातील राजापेठ अंडरपासची पहाणी करण्यासाठी आलेले महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर ३ महिलांनी अचानक शाई फेकली. शहरात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी त्याचा निषेध म्हणून महिलांनी हे कृत्य केले. या वेळी महिलांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या.

राजापेठ उड्डाणपुलावर १२ जानेवारी या दिवशी येथील आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता; मात्र हा पुतळा महापालिका आयुक्तांनी १६ जानेवारी या दिवशी मध्यरात्री काढून टाकला. यामुळे छत्रपती शिवरायांचा अवमान झाला असून आम्ही शिवप्रेमी महापालिका आयुक्तांचा निषेध नोंदवतो, असे पत्र देऊन काही आक्रमक महिलांनी महापालिका आयुक्तांच्या दिशेने शाई भिरकावली. महापालिकेचे अधिकारी आणि सुरक्षारक्षक यांनी महापालिका आयुक्तांना महिलांच्या तावडीतून सोडवून त्यांच्या वाहनात बसून घटनास्थळावरून रवाना केले.