नाशिक येथील सायकलपटू यामिनी खैरनार यांच्याशी कर्नाटक पोलिसांचे गैरवर्तन !

पोलीस उपनिरीक्षकांसह २ पोलिसांवर गुन्हा नोंद !

महिलांनो, पोलिसांची महिलांशी गैरवर्तन करण्याची विकृत मनोवृत्ती नष्ट करण्यासाठी वैध मार्गाने लढा ! – संपादक

यामिनी खैरनार

नाशिक – येथील सायकलपटू यामिनी खैरनार यांच्याशी गैरवर्तन करणे कर्नाटक पोलिसांना महागात पडले आहे. कर्नाटकात प्रवेशासाठी तडजोडीची भाषा करणार्‍या  पोलिसांच्या विरोधात यामिनी खैरनार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकांसह २ पोलिसांवर गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री कर्नाटकातील बालूर्गी पडताळणी नाक्याजवळ घडली.

यामिनी खैरनार स्वतःच्या कुटुंबासमवेत सोलापूरहून गाणगापूरकडे चारचाकी वाहनातून जात होत्या, तेव्हा कर्नाटकातील बालूर्गी पडताळणी नाक्याजवळ मद्याच्या नशेत असणार्‍या ३ पोलिसांनी त्यांना अडवून कोरोना चाचणी अहवालाची मागणी केली; पण कोरोना लसीचे दोन्हीही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवूनही पोलिसांनी त्यांना कर्नाटकात प्रवेश देण्यास नकार दिला, तसेच ‘तुम्ही एखाद्या अधिकार्‍याला दूरभाष करा, नाहीतर आपण तडजोड करू’, असे पोलिसांनी त्यांना सांगितले. (भ्रष्टाचाराने पोखरलेले कर्नाटक पोलीस प्रशासन ! कोरोना लसीचे प्रमाणपत्र दाखवूनही तडजोडीची भाषा करणारे पोलीस जनतेचे रक्षक आहेत कि भक्षक ! पोलीस खात्यात असे भ्रष्ट पोलीस असल्याने जनतेमध्ये पोलीसदलाची प्रतिमा मलीन झाली आहे. – संपादक)  

या वेळी यामिनी यांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. ओळखपत्र मागताच त्या तिघांनी त्यांना त्यांच्या वाहनातून खाली उतरण्यास भाग पाडून अरेरावीची भाषा चालू केली. त्या ३ पोलिसांकडे मास्क आणि ओळखपत्र नव्हते. त्यांनी मद्य प्राशन केले होते. ११२ क्रमांकावरील पोलीस साहाय्य केंद्रास संपर्क केल्यानंतर दीड घंट्यांनी तेथे पोलीस, आरोग्य आणि महसूल विभागाचे अधिकारी पोचले. (अशी आहे कर्नाटक पोलिसांची तत्परता ! असे पोलीस आपत्काळात जनतेचे त्वरित रक्षण करू शकतील का ? – संपादक)

त्यानंतर यामिनी जवळील अफजलपूर पोलीस ठाण्यात गेल्या त्या वेळी तेथे पोलीस झोपले होते. (कर्तव्याच्या वेळी असे झोपा काढणारे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण करू शकतील का ? – संपादक) तेथे पोलीस उपनिरीक्षक आणि इतर पोलीस यांनी यामिनी यांच्याशी हुज्जत घालत तक्रार नोंदवण्यास नकार दिला. इतकेच नव्हे, तर मध्यरात्री २ घंटे पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते, असे यामिनी यांनी सांगितले. (अशा पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हेही नोंद करायला हवेत ! – संपादक) या मानसिक छळानंतरही न डगमगता यामिनी यांनी थेट कर्नाटक येथील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी दूरभाषवर संपर्क साधून माहिती दिली, त्यानंतर सकाळी ६ वाजता त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांना क्षमा मागण्याची वेळ आली. या वादात पडताळणी नाक्यावर अन्य राज्यांतील वाहनांना कोणीच न अडवल्याने महाराष्ट्रद्वेषाचा कर्नाटकी वृत्तीचा अनुभव समोर आला आहे.