२७.१.२०२२ या दिवशी नगर येथील पू. (कै.) (श्रीमती) रुक्मिणी लोंढेआजी यांनी देहत्याग केला. त्या ९६ वर्षांच्या होत्या. ८.२.२०२२ हा त्यांचा देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा श्री. रामकृष्ण लोंढे यांना जाणवलेली पू. आजींची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. उत्साही आणि हसतमुख
‘पू. आई प्रचंड उत्साही होती. ती कुटुंबातील सर्वांची विचारपूस करत असे. ती नेहमी हसतमुख असे.
२. तिची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण होती. तिच्या सर्व स्मरणात रहायचे.
२. उत्तम शरीरस्वास्थ्य
वयाच्या ९६ व्या वर्षीही तिची दृष्टी चांगली होती. ती भरपूर वाचन करत असे. तिचा आवाज कणखर होता. तिला वार्धक्याविना कोणतीही व्याधी नव्हती. त्यामुळे तिला कधी वैद्यकीय उपचारांची आवश्यकता भासली नाही. ती गेल्या २ वर्षांत अनेक वेळा पडली; परंतु तिला कुठेही जखम झाली नाही. तिचा आहार अखेरपर्यंत चांगला होता. ती शेवटच्या आजारपणात मलमूत्र विसर्जन करायची. तेव्हा त्यांना कधीही दुर्गंध आला नाही.
३. समाधानी वृत्ती
पू. आईला काही खायला हवे असल्यास ती मागून घेत असे आणि जे मिळेल, ते खाऊन तृप्त होत असे. तिला ‘काही हवे का ?’, असे कोणी विचारल्यास ती हसून ‘काही नको’, असे सांगत असे. ‘ती समाधानी आणि तृप्त आहे’, असे आमच्या लक्षात यायचे. ती सातत्याने देवाला ‘आता माझे काहीही राहिले नाही. देवा, मला घेऊन जा. आई, मला घेऊन जा’, असे सांगत असे.
४. विनम्रता आणि कृतज्ञताभाव
आम्ही प्रतिदिन पू. आईला अंघोळ घालणे, तिचे आवरून देणे, तिला हवे असलेले साहित्य देणे, अल्पाहार आणि जेवण भरवणे आदी गोष्टी केल्यावर ती आम्हाला हात जोडून ‘छान… छान…’ म्हणून कृतज्ञता व्यक्त करत असे.
५. चूक झाल्यावर क्षमायाचना आणि स्वतःला शिक्षा करणे
ती कोणाशी कधी रागावून बोलल्यास नंतर ‘‘मी चुकले, चुकले’’ असे सारखे म्हणायची. ती कान पकडून क्षमा मागायची. ती स्वतःच्या गालावर मारून घेऊन स्वतःला शिक्षा करून घ्यायची.
६. साधना
अ. ती प्रतिदिन हरिपाठ आणि आध्यात्मिक ग्रंथ यांचे वाचन करायची. ती सतत ‘ॐ नमः शिवाय ।’, ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ आणि ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव ।’ हे नामजप आलटून पालटून करत असे.
आ. तिच्या पलंगासमोरील भिंतीवर श्रीकृष्णाचे चित्र लावलेले होते. ती त्या चित्राशी सतत बोलत असे.
७. पू. आईंनी देहत्याग करण्याविषयी दिलेल्या पूर्वसूचना
अ. पू. आईने देहत्याग करण्याच्या ८ दिवस आधी माझी मुलगी सौ. गायत्री पांडे (पू. आईची नात) आणि तिचे कुटुंबीय पू. आईला भेटण्यासाठी आले असतांना पू. आईने सौ. गायत्रीला सांगितले, ‘‘तू जाऊ नकोस. येथेच थांब. तू गेलीस, तर मीही जाईन.’’ प्रत्यक्षात सौ. गायत्री घरी गेल्यावर पाचव्या दिवशी पू. आईने देहत्याग केला.
आ. देहत्यागाच्या आदल्या दिवशी सकाळी ‘‘मी उद्या जाणार आहे’’, असे तिने आम्हाला सांगितले. त्यानंतर तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही.
८. पू. आईच्या देहत्यागापूर्वी तिच्या तोंडवळ्यावर पुष्कळ तेज आणि शांती दिसत होती. देहत्याग करतांना तीला कोणताही त्रास झाला नाही, तर अगदी शांततेत तिचे शरीर शांत झाले.
९. पू. आईंच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
अ. पू. आईने देहत्याग केल्यावर घरात एक वेगळाच सुगंध येत होता आणि वातावरणात चैतन्य जाणवत होते.
आ. पू. आईच्या देहत्यागाच्या पहिल्या दिवशी दिव्याखाली ठेवलेल्या पिठावर सुदर्शनचक्राची आकृती उमटलेली पाहून गुरुजींनी त्या विष्णुलोकी गेल्याचे सांगितले.
इ. ‘पू. आईला अंत्यसंस्कारासाठी नेतांना तिच्या तोंडवळ्यावर तेज आणि वेगळ्याच प्रकारचे भाव दिसत होते’, हे अनेकांच्या लक्षात आले.
ई. पू. आई आम्हा सर्वांना सोडून गेलेली असली, तरी आम्हाला तिचे घरात अस्तित्व जाणवत आहे.
१०. साकुरी संस्थानातील संतांनी पू. आईंना अंतिम समयी नेसवण्यासाठी साडी, तीर्थ आणि उदी पाठवणे
साकुरी संस्थानातील संत पू. गोदावरी माताजी यांच्या समाधीस्थानी प्रतिदिन साडी नेसवतात. साकुरी संस्थानच्या श्री उपासनी कन्याकुमारी स्थानाच्या प्रमुख कन्या पू. माधवीताई यांनी ती साडी पू. आईंच्या देहत्यागानंतर त्यांना नेसवण्यासाठी पाठवली आणि अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांनी प.पू. उपासनीबाबा महाराज यांचे तीर्थ आणि उदी पाठवली होती.
११. साकुरी येथील श्री उपासनी कन्याकुमारी स्थानाच्या प्रमुख कन्या पू. माधवीताई यांनी वाहिलेली श्रद्धांजली
साकुरी येथील श्री उपासनी कन्याकुमारी स्थानाच्या प्रमुख कन्या पू. माधवीताई यांनी सांगितले, ‘‘श्रीमती रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढे या साकुरी संस्थानसाठी ‘लोंढेवहिनी’ म्हणून परिचित होत्या. त्यांची साकोरीचे श्री उपासनी महाराज आणि प.पू. गोदावरी माताजी यांच्या ठायी पुष्कळ श्रद्धा होती. त्यांनी अनेक दिवस अन्नपूर्णाकक्षात प्रेमाने सेवा केली. त्यांची हसतमुख, नऊवारी साडीतील वात्सल्यमूर्ती कायम स्मरणात रहाते. त्या भजन, पूजन आणि भक्तीरस यांनी युक्त असे जीवन जगल्या. त्यांना साकुरी स्थानाविषयी सतत आंतरिक ओढ होती. लोंढे परिवाराचे आणि उपासनी कन्याकुमारी स्थानाचे ऋणानुबंध अतिशय जुने आहेत. आम्ही सर्वजण लोंढे परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत.’’
– श्री. रामकृष्ण पुरुषोत्तम लोंढे (पू. आजींचा मुलगा, ज्येष्ठ पत्रकार) (वय ६७ वर्षे), तालुका राहाता, जिल्हा नगर. (४.२.२०२२)
पू. (कै.) श्रीमती रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढे यांचे आध्यात्मिक कुटुंब
रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या सौ. अवनी संदीप आळशी आणि सौ. नंदिनी नीलेश चितळे या पू. लोंढेआजी यांच्या नाती आहेत, तर सनातनच्या ग्रंथ संकलनाची सेवा करणारे पू. संदीप आळशी आणि रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. नीलेश चितळे हे नातजावई आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |