(सी.बी.एस्.ई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) अर्थात् केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ)
वेंगुर्ला – येथील नगर परिषदेच्या वतीने शहरात राबवण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाचे धडे आता विद्यार्थी गिरवणार आहेत. शासनाने सी.बी.एस्.ई.च्या इयत्ता ६ वीच्या विज्ञान विषयात ‘कचरा-संघटन एवं निपटान’ या धड्याच्या अंतर्गत या अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे. त्यामुळे वेंगुर्ले शहराच्या नावलौकिकामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वेंगुर्ले नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी वेंगुर्लेमध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, ‘कचरा डेपो’चे ‘स्वच्छ भारत पर्यटन केंद्रात’ रूपांतर, प्लास्टिक मुक्ती, ‘वसुंधरा वाचवा’ आदी मोहिमा राबवून सर्वांना यामध्ये सहभागी करून घेतले होते. ही परंपरा आजही चालू आहे. त्यामुळे वेंगुर्ला नगर परिषदेने आतापर्यंत स्वच्छता अभियानात जिल्हा, विभाग, राज्य आणि देश या पातळ्यांवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. या पुरस्कारांतून मिळालेल्या बक्षीसरूपी रकमेतून शहरातील अनेक विकासात्मक कामे पूर्णत्वास गेली आहेत. ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’, असा बीजमंत्र घेऊन चालू झालेल्या स्वच्छतेच्या चळवळीतून ‘माझा वेंगुर्ला-स्वच्छ वेंगुर्ला-सुंदर वेंगुर्ला’ हे घोषवाक्य केवळ राज्यातच नाही, तर देशपातळीवर पोचले आहे.